कोलंबो| शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर रविवार रोजी (२५ जुलै) पार पडलेला पहिला टी२० सामना जिंकला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत करत टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने संघाच्या विजयात बहुमुल्य योगदान दिले आहे. त्याने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर करत शानदार पराक्रम केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि केवळ १८.३ षटकातच श्रीलंकेला १२६ धावांवर गुंडाळले. त्यातही भुवनेश्वरने आपल्या भेदक माऱ्याने श्रीलंकेच्या एक-दोन नव्हे ४ फलंदाजांना पव्हेलियनला धाडले.
सर्वप्रथम त्याने श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडोला संजू सॅमसनच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर चामिका करुणारत्ने, इसुरू उडाना आणि दुष्मंता चमिरा यांना त्याने तंबूत पाठवले. विशेष म्हणजे, केवळ ३.३ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. यासह भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात श्रीलंकेविरुद्ध एका डावात ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा उल्लेखनीय विक्रम केला आहे.
कोणत्या संघाविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० सामन्यातील एका डावात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी भुवनेश्वरपुर्वी केवळ हरभजन सिंगने केली होती. फिरकीपटू हरभजनने इंग्लंडविरुद्ध हा कारनामा केला होता. या दोघांशिवाय कोणताही भारतीय गोलंदाज ही उपलब्धी साध्य करू शकलेला नाही.
भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव केला उद्ध्वस्त
पहिल्या टी२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना २० षटकांचा खेळही खेळू दिला नाही. भुवनेश्वरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दिपक चाहरनेही संघाला २ महत्त्वपुर्ण विकेट्स मिळवून दिल्या. तसेच युझवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: चमिराची चपळ गोलंदाजी; पहिलाच चेंडू असा टाकला की, शॉ भोपळाही न फोडता झेलबाद
पदार्पणाच्या टी२० सामन्यात शुन्यावर बाद होऊनही पृथ्वी शॉच्या नावावर ‘मोठे’ विक्रम; रोहितलाही पछाडल