आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. एक नाही, तर दोन वेळचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमी याच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी कर्णधार डॅरेन सॅमी वेस्ट इंडिजचा नवीन मुख्य प्रशिक्षक बनला आहे. त्याच्याव्यतिरिक्त जमैकाचा माजी क्रिकेटपटू आंद्रे कोली याच्यावरही मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही वेस्ट इंडिजच्या संघाचे वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारात प्रशिक्षकपद भूषवणार आहेत. याची माहिती वेस्ट इंडिजच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज संघाच्या पुरुषांच्या वरिष्ठ संघासाठी डॅरेन सॅमी (Daren Sammy) आणि आंद्रे कोली (Andre Coley) यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्या बहुप्रतीक्षित क्रिकेट वेस्ट इंडीज संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गुरुवारी (दि. 11 मे) पारदर्शक मुलाखत प्रक्रियेनंतर करण्यात आल्या आहेत.
कोणाकडे कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद?
आंद्रे कोली हा वेस्ट इंडिज अ संघ आणि वरिष्ठ पुरुषांच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळेल, तर सॅमी हा वरिष्ठ संघाला मर्यादित षटकांच्या म्हणजेच वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट प्रकारात प्रशिक्षण देताना दिसेल.
🚨BREAKING NEWS🚨
Daren Sammy & Andre Coley announced as the newly appointed WI Men's Head Coaches.Read More⬇️ https://t.co/C3D6Q3alZm
— Windies Cricket (@windiescricket) May 12, 2023
जूनमध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध जेव्हा संघाचा सामना होईल, तेव्हा डॅरेन सॅमी नवीन मुख्य प्रशिक्षक (Daren Sammy New Head Coach) म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात करेल. तसेच, आंद्रे कोली हा कसोटी मुख्य प्रशिक्षक म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध जुलैमध्ये कॅरेबियन बेटांवर दोन कसोटी सामन्यात आपल्या कामाला सुरुवात करेल.
डॅरेन सॅमीची कारकीर्द
डॅरेन सॅमी याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी जाणून घ्यायचं झालं, तर त्याने वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत 38 कसोटी सामने, 126 वनडे सामने आणि 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 84 विकेट्स घेण्यासोबतच 1323 धावाही केल्या आहेत. वनडेत त्याने 81 विकेट्ससह 1871 धावाही केल्या आहेत. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 44 विकेट्ससह 587 धावाही केल्या आहेत. विशेष म्हणजे, सॅमीने वेस्ट इंडिजला 2012 आणि 2016 सालच्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकून दिले होते. (big news former cricketer Daren Sammy and Andre Coley appointed head coaches for West Indies Men’s teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हिंसाचाराच्या घटनांनंतर इम्रान खान यांना जामीन मंजूर, पाकिस्तान आणीबाणीच्या उंबरठ्यावर
‘मी स्वतःहून कधीच…’, विराटसोबतच्या वादानंतर नवीन उल हकची पहिलीच मुलाखत