भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जेव्हा भारताकडून मैदानावर खेळत होते, तेव्हा ते आपल्या फलंदाजीने विरोधी संघाला नमवविण्यासाठी ओळखले जायचे. शास्त्री जेव्हा भारतीय संघाकडून खेळायचे, तेव्हा ते आपली आक्रमकता दाखविण्यात मागे पुढे पाहत नसत. मैदानाबाहेर ‘कूल’ अंदाजात दिसणारे शास्त्री मैदानावर एका वेगळ्याच अंदाजामध्ये दिसायचे. कदाचित याचमुळे शास्त्री आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीमध्ये चांगलाच ताळमेळ दिसतो. त्याचबरोबर त्यांच्या रणनीतिमध्येही आक्रमकता पहायला मिळते.
अशीच एक घटना शास्त्रींबरोबर त्यांच्या खेळाच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घडली होती, जेव्हा त्यांना माइक व्हिटनीने डोकं फोडण्याची धमकी दिली होती. शास्त्री यांनी व्हिटनी यांच्या धमकीला सडेतोड उत्तर दिले होते. या घटनेला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी स्लेजिंगपैकी (अपशब्द वापरणे) एक मानले जाते.
क्रिज सोडली तर डोके फोडेल
क्रिकेट इतिहासात घडलेली सर्वात मोठी स्लेजिंगची ही घटना १९९१-९२ ची आहे, जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात होता. यादरम्यान शास्त्री भारताकडून सलामीला फलंदाजी करत होते. आणि ते मैदानावर फलंदाजी करत होते. त्यावेळी मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने १२ वा खेळाडू माइक व्हिटनी यांना क्षेत्ररक्षणासाठी बोलावले होते.
व्हिटनी यांचे आगमन झाल्यानंतर शास्त्री यांनी मिड ऑफच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. व्हिटनी याबाबतीत अधिकच आक्रमक झाले आणि थेट शास्त्री यांना जाऊन म्हटले की जर त्यांंनी क्रिज सोडली (धाव घेण्यासाठी), तर ते शास्त्री यांचे डोकं फोडतील.
शास्त्रींचे सडेतोड प्रत्युत्तर
व्हिटनी यांचा आक्रमक अंदाज पाहून शास्त्री यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. शास्त्री यांच्या प्रत्युत्तराने केवळ व्हिटनी यांचे तोंड बंद झाले नाही तर दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये बातम्यादेखील छापण्यात आल्या.
शास्त्री यांनी रागात म्हटले होते, “ऐक, ज्याप्रकारे तू बोलतोय जर त्याचप्रकारे तुला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता आली असती, तर तू संघातील १२ वा खेळाडू नसता.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शास्त्रींची जबरदस्त आकडेवारी
शास्त्री यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या. परंतु ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांची आकडेवारीही बलाढ्यच होती.
शास्त्री यांनी आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ७७.७५ च्या सरासरीने ६२२ धावा केल्या. त्यामध्ये २ शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. तसेच त्यांनी २६ विकेट्सही घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त त्यांनी इंग्लंडविरुद्ध ४ शतके आणि पाकिस्तानविरुद्ध ३ शतके ठोकली. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी २ शतके ठोकली.
वाचनीय लेख-
-भारताच्या ‘त्या’ ५ खेळाडूंचा झाला नाही योग्य वापर; नाही तर आज असते…
-आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे कोच झालेले ५ दिग्गज
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना