कसोटी कारकीर्दीत शतक न करता सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर या यादीतील दुसरे नाव चेतन चौहान यांचे येते. भारताच्या या माजी सलामीवीरने 40 कसोटी सामन्यांमध्ये 2084 धावा केल्या आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या 97 होती.
कारकीर्दीत (1969-81) शतक न करता दोन हजार धावा करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले होते. शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर आहे. त्याने (1992-2007) 145 कसोटीत 3 हजार 154 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 99 होती.
आज (21 जुलै) चेतन चौहान यांचा वाढदिवस आहे. ते 73 वर्षांचे झाले. त्याचा जन्म 1947 मध्ये बरेली येथे झाला होता. सुनील गावस्कर चेतन चौहान यांची सलामीची जोडी प्रसिद्ध होती. गावस्कर आणि चौहानच्या जोडीने कसोटी सामन्यातील 60 डावात 54.85 च्या सरासरीने 3127 धावा केल्या. दोघांनी एकूण 11 शतकांची भागीदारी केली, यामधील 10 शतकी भागीदारी सलामीला खेळताना केली होती.
1979 साली झालेल्या ओव्हल कसोटीत सुनील गावस्कर आणि चेतन चौहान यांच्यातील सलामीची भागीदारी आजही आठवते. इंग्लंडविरुद्ध 438 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दोघांनी पहिल्या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर चौहान 80 धावांवर बाद झाले, तर गावस्करांनी द्विशतक ठोकले (221). तथापि, भारतीय संघ केवळ 429/8 धावा करू शकला आणि जिंकण्यापासून वंचित राहिला.
चेतन चौहानने सप्टेंबर 1969 मध्ये मुंबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या 25 मिनिटांपर्यंत कोणतीही धावा करता आली नाहीत, परंतु त्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्रुस टेलरच्या चेंडूवर चौकार मारुन खाते उघडले आणि पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकला.
चेतन चौहान यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या, त्यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी 7 वनडे सामन्यात 21.86 च्या सरासरीने 153 धावा केल्या. चेतन चौहान यांचा 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास संपला, पण 1985 पर्यंत ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहिले. त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीकडून रणजी करंडक खेळले. वडिलांच्या बदलीनंतर ते वयाच्या 13 व्या वर्षी पुण्यात स्थायिक झाले होते.
चौहान यांनी 1980-81 मध्ये न्यूझीलंड दौर्यावर शेवटचा कसोटी सामना खेळले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, ”निवड समितीने माझ्यावर असे का केले हे मला माहिती नाही. मी चांगल्या लयीत खेळत होतो. इतर भारतीय खेळाडूंपेक्षा माझा फॉर्म चांगला होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या पुढील मालिकेत माझी निवड झाली नव्हती. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो.”
चेतन चौहान हे टीम इंडियाचे व्यवस्थापकही होते. 2001 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान ऐतिहासिक कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणार्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. 2007-08 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरही ते व्यवस्थापक होते. याच दरम्यान मंकीगेट प्रकरण गाजले होते.






