एक वेळ अशी होती की तो माझा क्रिकेटमधला सर्वाधिक नावडता खेळाडू होता. वय वाढत गेलं तसं खेळाडूंपेक्षा क्रिकेटवर श्रद्धा वाढत गेली आणि तो आवडू लागला. इतका की आजही तो माझा सगळ्यात आवडता वेगवान गोलंदाज आहे. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनची त्याची शैली आजही ठळकपणे आठवते आणि तितकीच आवडतेसुध्दा. जितकी त्याची गोलंदाजी आवडायची तितकीच त्याची कॉमेंट्रीदेखील आवडते. उत्तम इंग्लिश बोलू शकणाऱ्या पाकिस्तानच्या काही निवडक खेळाडूंमध्ये तो अग्रस्थानी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो खेळाडू म्हणजे वसीम अक्रम.
स्विंग गोलंदाजीचा बादशहा म्हणून वसीमचं नाव घेतलं जातं. रिव्हर्स स्विंग आणि पाकिस्तानी गोलंदाज हे नातं जास्तच गाढं आहे.सर्फराज नवाझने सुरू केलेली रिव्हर्स स्विंगची कला इम्रान खानला शिकवली.त्याने ती आपला पठ्ठ्या वसीमकडे हस्तांतरित केली. वसीमने आपल्या स्विंगने भल्याभल्यांच्या दांड्या गुल केल्या.
देशांतर्गत स्पर्धेत न खेळता एकदम आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये वसीमचा समावेश होतो. पाकिस्तान संघातल्या त्याच्या समावेशाची कहाणीदेखील रंजक आहे.लाहोरच्या सुप्रसिद्ध गद्दाफी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या निवडचाचणीसाठी वसीमही गेला होता. पहिल्या दोन दिवसांत त्याला गोलंदाजी करायची फारशी संधी मिळालीच नाही.तिसऱ्या दिवशी वसीमची गोलंदाजी नेटमध्ये खेळणाऱ्या जावेद मियाँदादने पाहिली आणि त्याने लगेचच वसीमला पाकिस्तानच्या संघात घ्यावे अशी शिफारस केली. (आजही अनेकांना वसीमची गुणवत्ता इम्रान खानने हेरली असे वाटते.) आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात १० बळी घेत त्याने आपण इम्रानच्या छायेत राहणार नसल्याचे संकेत दिले.
नव्वदच्या दशकांत अॅलन डोनाल्ड, ग्लेन मॅकग्रा, वॉल्श, अँब्रोस, वकार युनूस असे वेगवान गोलंदाज असतानाही अक्रम या सगळ्यांमध्ये उजवा ठरला. चेंडूच्या वेगाबरोबरच स्विंगवरही आपल्याला हवे तसे नियंत्रण ठेवण्याचे त्याचे कौशल्य वादादीत होते. हातात चेंडूची सीम लपवून छोटासा रनअप घेत अतिशय वेगात चेंडू टाकण्याची त्याची शैली अनेकांना आवडली. जितक्या सहजतेने तो बाउंसर टाके तितक्याच सहजतेने तो स्लोअरवन टाकून फलंदाजाला बुचकळ्यात पाडी. भरपूर वाढलेले, कपाळावरून मागे घेतलेले झुपकेदार केस, चेहऱ्यावरचे व्रण यामुळे भीतीदायक दिसणारा वसीम गोलंदाजीही तशीच करत असे. विकेट मिळाल्यानतंर त्याने केलेला जल्लोष असा असे की विरोधी संघाच्या चाहत्यांच्या तोडांत त्याच्यासाठी अगदी शिव्या येत असत.
ब्याण्णवचा विश्वचषक पाकिस्तानला जिंकून देण्यात इम्रान खानच्या नेतृत्वाबरोबरच वसीमची गोलंदाजीही तितकीच कारणीभूत होती. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने अॅलन लॅम्ब, ख्रिस लुईस, इयन बोथमचे बळी घेताना टाकलेले तीन चेंडू अफाट होते. तेव्हा हा विश्वचषक पाहिला नसला तरी नंतर युट्युबवर कित्येकदा वसीमच्या त्या सामन्यातल्या गोलंदाजीचे व्हिडीओ पाहण्यात वेळ घालवला आहे. वसीम आणि वकारच्या जोडगोळीने नव्वदच्या दशकात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची अनेकदा भंबेरी उडवली.
कारकिर्दीच्या ऐन उमेदीत वसीमला स्वतःला मधुमेह असल्याचे कळले. त्यावेळी पाकिस्तानच्या संघातील सर्वाधिक फिट असणाऱ्या खेळाडूंपैकी एक वसीम होता. तो दररोज किमान १० किमी पळत असे. एवढे असूनही आपल्याला मधुमेह झाल्याचे ऐकून वसीमला धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला जवळपास एक महिना लागला. त्यानंतरही तो नुसता क्रिकेट खेळला नाही तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी १५० हुन अधिक विकेट्सही काढल्या.
२००३ च्या विश्वचषकात त्याच्या गोलंदाजीवर अब्दुल रझाकने सचिनचा झेल सोडला तेव्हा त्याचा आगतिक चेहरा भारतीय चाहता म्हणून पाहण्यासारखा असला तरी वसीमच्या गोलंदाजीचा चाहता म्हणून निश्चितच वाईट वाटणारा होता. या विश्वचषकातच वसीमने एकदिवसीय सामन्यांत ५०० बळी घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळवला. (त्याचा हा विक्रम नंतर मुरलीधरनने मोडला.) या विश्वचषकानंतर लगेचच त्याला पाकिस्तान संघातून डच्चू मिळाला. त्यानेही फारशी वाट न पाहता निवृत्ती घेतली. आजही वसीम पाकिस्तानचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. अ दर्जाच्या सामन्यांत ८८१ बळींचा त्याचा विक्रम आजही अबाधित आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोन हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज असा अनोखा विक्रमही वसीमच्या नावावर आहे.
ब्रायन लारासारखा महान फलंदाज जेव्हा, ” वसीमच्या गोलंदाजीवर मला कधीही स्वतःच्या फलंदाजीवर माझे नियंत्रण आहे असे वाटले नाही.” असे म्हणतो तेव्हा वसीमच्या गोलंदाजीची महनीयता ध्यानात येते.
निवृत्तीनंतर वसीमने आपल्याला लाभलेल्या इंग्लिशच्या देणगीचा वापर करत समालोचक होणे पसंत केले. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम केले. भारताच्या झहीर खान, इरफान पठाण यांच्यासारख्या गोलंदाजांना त्यांच्या उमेदीत मार्गदर्शन करायला वसीमने कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत यावरून एक माणूस म्हणूनही तो मोठा आहे हे पटते.
वाचा –
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!
ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास