आयपीएल 2023 मध्ये एक नवा नियम सुरू करण्यात आला आहे. तो म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर नियम. टी20 क्रिकेट आणखी समृद्ध बनण्यासाठी हा निर्णय लाभदायक ठरेल. त्या निर्णयाचे चांगले परिणाम देखील स्पर्धेत दिसत आहेत. त्याचवेळी हा पहिला इम्पॅक्ट प्लेयर होण्याचा मान मिळाला होता सीएसकेसाठी खेळणाऱ्या तुषार देशपांडेला. आज 15 मे तुषार देशपांडेचा वाढदिवस.
तुषार देशपांडे एकदम हाडाचा मुंबईकर. त्याचा जन्म कल्याणचा. त्याच्या क्रिकेटचा श्रीगणेशा झाला मुंबईच्या अशाच गल्लीमधून. लहानपणापासून क्रिकेटर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या तुषारने वयाच्या नवव्या वर्षीपासून फलंदाजीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तो चांगला बॉल टाईम तेव्हापासूनच करत होता. मात्र, तो अचानकपणे वेगवान गोलंदाज बनला, ते देखील फक्त लवकर घरी जायला मिळावे म्हणून.
मुंबईच्या अंडर 13 संघाची 2007 मध्ये शिवाजी पार्कवर ट्रायल होती. ती ट्रायल देण्यासाठी तुषार आपल्या मित्रांसह कल्याणवरून आला होता. फलंदाजीच्या लाईनमध्ये शंभर-दीडशे मुलं पाहून पाहून त्याने थेट 20-25 जणांच्या वेगवान गोलंदाजांची लाईन पकडली. अगदी आकस्मित त्या लाईनमध्ये गेलेल्या तुषारने सर्वात वेगवान चेंडू टाकले. त्या ट्रायलमध्ये खेळाडू निवडण्याची जबाबदारी होती दिग्गज पद्माकर शिवलकर यांच्या खांद्यावर. त्यांना तुषारचा खेळ आवडला आणि त्याची मुंबईच्या अंडर 13 संघात निवड झाली. त्यानंतर तुषार मुंबईसाठी प्रत्येक वयोगट स्पर्धा खेळू लागला. त्याच्या वेगामुळे त्याला नाव पडले कल्याण एक्सप्रेस.
अनेकांना माहीत नसेल मात्र तुषार आयपीएलच्या पहिल्या हंगामात बॉलबॉय होता. त्यावेळी अनेक खेळाडूंशी हात मिळवण्याची व फोटो काढण्याची संधी त्याला मिळाली होती. त्यानंतर तुषारने कठोर मेहनत घेतली. वयोगट स्पर्धा गाजवत असताना तो 2016-2017 ला मुंबईच्या रणजी संघात दाखल झाला. अल्पावधीत तो मुंबईचा प्रमुख गोलंदाज झाला. पुढे इंडिया ए तसेच दुलीप ट्रॉफी खेळण्याची देखील त्याला संधी मिळाली.
ज्या आयपीएलमध्ये बॉल बॉय म्हणून त्याने काम केलेले ती आयपीएल त्याला 2020 मध्ये खेळता आली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला पहिली संधी दिली. मात्र, 5 सामन्यात तो केवळ तीन बळी घेऊ शकला. मागील वर्षी चेन्नईने त्याला करारबद्ध केले. परंतु, खेळायला मिळाले अवघे दोन सामने. यंदा मात्र त्याने धोनीचा विश्वास जिंकला. पहिल्या सामन्यापासून तो संघाचा भाग आहे. 13 सामन्यात 19 विकेट घेऊन अजूनही पर्पल कॅपच्या शर्यतीत तो धावताना दिसतो.
अगदी अनपेक्षितपणे वेगवान गोलंदाज झाल्यानंतर मेहनतीच्या जोरावर त्याने आजवरचा प्रवास केला आहे. भविष्यात भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी त्याला मिळते का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
(Birthday Article On CSK Pacer Tushar Deshpande)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
VIDEO:..आणि गावसकरांनी शर्टवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, पाहा आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षण
धोनीने चेन्नईत खेळला अखेरचा सामना? चेपॉकवर फेरी मारत चाहत्यांना म्हणाला, “थॅन्कू”, पाहा व्हिडिओ






