श्रीलंकेचा क्रिकेट दिग्गज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आज (30 जून) आपला 54 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या काळातील जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असलेल्या जयसूर्याचा उपयोग कामचलाऊ फलंदाज आणि गोलंदाज म्हणून केला जात होता. मात्र, त्यानंतर 1996 मध्ये जयसूर्याला सलामीवीर बनविण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण विश्व क्रिकेटची दिशाच बदलली. एका रात्रीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोलंदाजाचा एक विश्वस्तरीय सलामीवीर बनला. संपूर्ण कारकिर्दीत 20 हजार पेक्षा जास्त धावा आणि 42 शतके ही आकडेवारी फलंदाज म्हणून सनथ जयसूर्याच्या उंचीची साक्ष देते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण
सन 1988 मध्ये खेळलेल्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात जयसूर्याने प्रथम श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले आणि यानंतर त्याची पाकिस्तान दौर्यासाठी श्रीलंकेच्या ब संघात निवड झाली. पाकिस्तानात जाऊन त्याने दोन चमकदार द्विशतके ठोकली आणि जयसूर्याला श्रीलंकेच्या वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली. जयसूर्याने 1989 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो अवघ्या 3 धावा काढून बाद झाला.
जयसूर्याच्या कारकीर्दीची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि हे चक्र 4 वर्षे सुरू राहिले. जयसूर्या 33 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावू शकला नव्हता. 28 ऑक्टोबर 1993 पर्यंत त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ 34 धावा होती. यानंतर, शारजाह येथे खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरूद्ध त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्यात आले आणि त्याने आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. जयसूर्याने 58 धावा केल्या आणि पुढच्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले. यानंतर त्याला सलग 14 डावांमध्ये पुन्हा अर्धशतक करता आले नाही.
सलामीवीर म्हणून मिळाली पहिली संधी
श्रीलंकेच्या संघाने 1994 मध्ये जयसूर्याला सलामीवीर म्हणून प्रथमता फलंदाजीसाठी उतरवले. पाकिस्तानचा संघ श्रीलंका दौर्यावर आला आणि जयसूर्याने तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावली. तरीही जयसूर्या श्रीलंकेच्या संघाचा नियमित सदस्य नव्हता, त्याच्या फलंदाजीचा क्रम नेहमी बदलत. यानंतर 1994 मध्ये 8 डिसेंबर रोजी जयसूर्याने पहिला मोठा धमाका केला. न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सलामीवीर म्हणून त्याने 140 धावा केल्या. जयसूर्याने पदार्पणानंतर तब्बल पाच वर्षाच्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक झळकावले.
1996 चा अविश्वसनीय विश्वचषक
सन 1996 मध्ये भारत-पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघांनी संयुक्तपणे विश्वचषकाचे आयोजन केले होते. पाकिस्तान आणि भारत यांना विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यावेळी श्रीलंकेचा संघ खूपच कमकुवत होता, त्यांच्या विजयाची टक्केवारी केवळ 29 टक्के होती. श्रीलंकेच्या संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी, श्रीलंकेचे प्रशिक्षक डेव व्हॉटमोर होते आणि त्यांनी शक्य तितक्या धावा जमवायला हव्या असा पर्याय सुचवला.
त्या काळात संघ सहसा पहिल्या 40 षटकांत आरामात खेळत असत आणि शेवटच्या 10 षटकांत धावा जमवत. मात्र, व्हॉटमोर आणि कर्णधार रणतुंगाने पहिल्या 15 षटकांत वेगवान धावा करण्याची रणनीती आखली आणि जबाबदारी जयसूर्या व रोमेश कालुवितरणा यांना देण्यात आली. सनथ जयसूर्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “संघ व्यवस्थापनाला वाटत मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य नाही. सात वर्षाच्या कारकिर्दीत माझा योग्यरीत्या वापर करण्यात आला नव्हता. त्यांनी मला सलामीवीर म्हणून वेगवान धावा काढत इतर फलंदाजांवर दबाव कमी करण्यास सांगितले.”
जयसूर्याला सलामीला पाठवण्याचा जुगार खेळला गेला आणि त्यानंतर संपूर्ण जग थक्क झाले. जयसूर्याने 1996 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाला प्रत्येक सामन्यात तुफानी सुरुवात दिली. पहिल्या 15 षटकात जयसूर्या आणि कालुवितलणा यांनी एकत्रितपणे विरोधी संघांच्या गोलंदाजांवर आक्रमण करत विरोधी संघांना शरण येण्यास भाग पाडले. याचा परिणाम असा झाला की 1996 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाने एकही सामना गमावला नाही आणि अखेर जेतेपद जिंकले.
जयसूर्याने 1996 च्या विश्वचषकात 221 धावा केल्या. त्याने 6 बळी घेण्याबरोबरच 7 झेल घेतले आणि त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले गेले. श्रीलंकेच्या संघ, ज्याला या विश्वचषक स्पर्धचा दावेदार मानला जात नव्हते, त्या संघासाठी जयसूर्याने सलामीवीर बनून संपूर्ण खेळ फिरविला. जयसूर्याच्या पॉवरप्लेमधील क्रांतिकारक फलंदाजीमुळेच संपूर्ण विश्व क्रिकेटची विचारसरणी बदलली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
ICC WTC। फायनल मध्ये खेळायचं असल्यास भारताला या गोष्टी आवर्जून कराव्या लागतील
वॉर्नरचा झेल पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंही शॉक, पाहा श्रीलंकान कर्णधार कसा झाला बाद