आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही असे अनेक बंधू पाहिले आहेत. ज्यांनी एकाच वेळी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये युसुफ पठाण – इरफान पठाण, सॅम करन – टॉम करन तसेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या बंधूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. परंतु जो कारनामा स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ यांनी केला आहे. तो कारनामा अजुनपर्यंत कोणालाही करता आला नाहीये. आज हे दोन्ही बंधूं आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
स्टीव वॉ आणि मार्क वॉ यांच्यात लहान कोण?
स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ यांच्या जोडीने ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना १ दशक अधिराज्य गाजवले होते. या दोन्ही खेळाडूंच्या नावे एकत्र सर्वात जास्त वनडे आणि कसोटी सामने खेळण्याच्या विक्रम आहे. स्टीव वॉ आणि मार्क वॉ यांचा जन्म २ जून १९६५ मध्ये दक्षिण-पश्चिम सिडनीच्या उपनगराच्या कॅम्प्सी येथील कॅन्टरबरी हॉस्पिटलमध्ये रॉजर आणि बेव्हरली वॉ यांच्या घरी झाला होता. स्टीव्ह वॉ पेक्षा मार्क वॉ ४ मिनिटांनी लहान आहे. त्यामुळे मार्कला क्रिकेटच्या मैदानावर ज्युनियर वॉ असेही म्हटले जायचे.
दोघांना लहानपणापासूनच होते क्रिकेटचे वेड
स्टीव आणि मार्क यांना लहानपणापासूनच क्रिकेटचे प्रचंड वेड होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून १९८४ मध्ये स्टीवला भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, ९ जानेवारी १९८६ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध वनडे सामन्यात पदार्पण केले होते.
स्टीव्हला मिळाला होता आइसमॅनचा टॅग
भारतात झालेल्या १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत स्टीव्हने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतले होते. स्टीव्हने ऑस्ट्रेलियन संघासाठी डेथ ओवर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तसेच तो फलंदाजी करत असताना धावा करण्यात ही सक्षम होता. ज्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्याचवेळी स्टीव्हला आइसमॅनचा टॅग देण्यात आला होता.
एका भावाला केले संघाबाहेर तर दुसऱ्या भावाने केले पुनरागमन
विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर स्टीव्हची कामगिरी ढासळली होती. सतत निराशाजनक कामगिरी करत असल्यामुळे त्याला १९९१ मध्ये झालेल्या ॲशेस मालिकेतून संघाबाहेर करण्यात आले होते. तसेच मुख्य बाब म्हणजे, एका भावाला संघाबाहेर केल्यानंतर त्याची जागा घेणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा भाऊ मार्क होता. १९९१ मध्ये झालेल्या एका कसोटी सामन्यात मार्कने आपले कौशल्य सिद्ध करत शतक झळकावले होते. हे शतक झळकवल्यानंतर मार्कचे प्लेइंग ११ मध्ये स्थान निश्चित झाले होते.
त्यांनतर स्टीव्हने देखील वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्थान मिळाले होते. वेस्ट इंडिज दौऱ्यावर या दोन्ही बंधूंनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन संघासाठी एकत्र क्रिकेट खेळले होते. या मालिकेतील एक कसोटी सामना ज्यांच्या जीवनातील अविश्वसनीय सामना असेल. कारण त्यांनी या सामन्यात अनुक्रमे १२६ आणि २०० धावा केल्या होत्या.
वॉ बंधूंची कारकीर्द
स्टीव्ह वॉ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. स्टीव्हने आपल्या कारकीर्दीत एकूण १६८ कसोटी सामने खेळले. यात त्याने १०,९२७ धावा केल्या होत्या. यासोबतच त्याने ३२५ वनडे सामन्यात ३२.९० च्या सरासरीने ७५६९ धावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तसेच मार्क ने १२८ कसोटी सामन्यात ८०२९ धावा केल्या होत्या. तसेच २४४ वनडे सामन्यात ८५०० धावा केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज, अव्वल स्थानी आहे ‘हा’ दिग्गज
कसोटी जर्सी भारतीय खेळाडूंना वाटप करताना का घातले होते मितालीने पॅड्स, स्वत:च केला खुलासा
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!