दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथ आज (1 फेब्रुवारी) 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 286 सामन्यात नेतृत्व केले आहे. तसेच त्याने 163 सामन्यात विजय मिळवले आहेत.
स्मिथने आत्तापर्यंत 117 कसोटी सामन्यात 48.25 च्या सरासरीने 9265 धावा केल्या आहेत. तसेच 197 वनडे सामन्यात त्याने 37.98 च्या सरासरीने 6989 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 शतके केली आहेत.
पण त्याच्या या मोठ्या कारकिर्दीत 2009 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे पार पडलेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या कायमचा लक्षात राहिला. या सामन्यात त्याचा पहिल्या डावात एक हात मोडला असताना संघासाठी तो दुसऱ्या डावात आणि सामन्यातील चौथ्या डावात 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
हा कसोटी सामना कसोटीप्रेमी आजही विसरले नाहीत. याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ग्रॅमी स्मिथने त्यावेळी संघहिताला दिलेले प्राधान्य.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत 2-0 अशा फरकाने आफ्रिका आघाडीवर होती. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 445 धावांचा डोंगर उभा केला. स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात फलंदाजीला आला परंतु तो 30 धावांवर खेळत असताना मिचेल जॉन्सनचा ताशी 143 किलोमीटरने आलेला चेंडू स्मिथच्या हातावर लागला. त्यानंतर त्याने मैदान सोडले.
तो परतला असतानाही दक्षिण आफ्रिकेने एका बाजूने किल्ला चांगला लढवताना सर्वबाद 327 धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपला डाव 4 बाद 257 धावांवर घोषित केला आणि आफ्रिकेसमोर चौथ्या दिवशी 376 धावांचे लक्ष ठेवले.
दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दिवशी हा सामना वाचवण्यासाठी 8.2 षटके फलंदाजी करण्याची गरज होती. मैदानात 9व्या विकेटच्या रूपात एंटीनी आणि स्टेन खेळत होते. परंतु जेव्हा स्टेन बाद झाला तेव्हा सर्वांना वाटले की ऑस्ट्रेलिया जिंकली आहे आणि स्मिथ हात मोडल्यामुळे फलंदाजीला येणार नाही. परंतु असे झाले नाही आणि स्मिथ एखाद्या सेनापतीसारखा फलंदाजीला आला.
यावेळी त्याचे मैदानावरील प्रेक्षकांनी उठून टाळ्यांच्या गजरात खास स्वागत केले. विशेष म्हणजे एक हात मोडला असतानाही स्मिथ तब्बल 26 चेंडू खेळला परंतु त्यावेळीचा ऑस्टेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने आपला तिखट मारा सुरूच ठेवला. जेव्हा सामना वाचवण्यासाठी 11 चेंडू खेळण्याची गरज होती तेव्हा ताशी 145 किलोमीटरने आलेल्या मिचेल जॉन्सनच्या चेंडूचा स्मिथला एका हाताने सामना करता आला नाही आणि त्याच्या यष्टीचा जॉन्सनच्या चेंडूने वेध घेतला.
“It’s not quite a Graeme Smith walking out with a broken hand moment, but I’ll claim it anyway.” – @DaleSteyn62 #ProteaFire pic.twitter.com/asridzHzjg
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 8, 2018
त्यावेळचा ऑस्ट्रेलिया संघ हा फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी खेळत असे. त्यामुळे स्मिथ बाद झाल्यावर जॉन्सनसह सर्वच खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. परंतु पुन्हा भानावर आल्यावर त्यांनी स्मिथचे जाऊन कौतुक केले. त्यात ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंग सर्वात पुढे होता.
महत्त्वाच्या बातम्या –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला ‘अजय जडेजा’
IND vs ENG । भारत चार फिरकी गोलंदाजांना खेळवणार? माजी दिग्गजाचा संघाला अप्रत्यक्ष सल्ला