---Advertisement---

वाढदिवस विशेष: परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार

On: शुक्रवार, जानेवारी 5, 2024 8:25 AM
Mansur Ali Khan Pataudi
---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला एकाहून एक गुणवंत कर्णधार लाभले आहेत. सौरव गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली ही अलीकडच्या काही श्रेयस्कर कर्णधारांची नावे आहेत. याच यादीत माजी भारतीय दिग्गज मंसूर अली खान पतौडी (नवाब पतौडी) यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. पतौडी यांचा आज (5 जानेवारी) 83 वा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी 1941 साली मध्य प्रदेशची राजधानी भोपाल येथे त्यांचा जन्म झाला होता.

त्यानिमित्ताने जाणून घेऊया, त्यांच्या कारकिर्दीतील फार क्वचित माहित असलेल्या गोष्टी…

परदेशात भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार
कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा 1877 साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्याने झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने 1952 मध्ये मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा विजय मिळवला होता. हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील 24वा सामना होता. तर त्याच वर्षाच्या शेवटी भारताने मायदेशात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ही मालिका पाकिस्तान संघाविरुद्ध झाली होती.

परंतु, भारताला परदेशातील मैदानावर कसोटी मालिका जिंकण्यासाठी 1968 पर्यंत वाट पाहावी लागली होती. पतौडी यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा परदेशातील मैदानावर भारताला कसोटी मालिका जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 3-1 ने विजय मिळवला होता.

कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक सामने कर्णधार म्हणून खेळणारे खेळाडू (टक्केवारीत) –
पतौडी यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द अवघ्या 14 वर्षांची राहिली. परंतु, या छोट्याशा कारकिर्दीतही त्यांनी आपल्या फलंदाजी आणि नेतृत्त्वाने सर्वांची मने जिंकली होती. त्यांनी आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 46 कसोटी सामने खेळले होते. त्यापैकी तब्बल 40 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते; तर अवघे 6 सामने फक्त खेळाडू म्हणून खेळले होते.

यासह पतौडी यांचा कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक सामने कर्णधार म्हणून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत (टक्केवारीत) समावेश होतो. त्यांनी कसोटी कारकिर्दीतील 86.9 टक्के सामने हे कर्णधार म्हणून खेळले होते. त्यांच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू जेसन होल्डर (82.2) आणि डॅरेन सॅमी (78.9) यांचेही नाव या यादीत येते. तसेच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माइक ब्रेअर्ली (79.5) आणि दक्षिण आफ्रिकाचे दिग्गज हान्सी क्रोनिए (77.9) यांनीही कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत.

पदार्पणाच्या सहा महिन्यांच्या आतच झाला होता अपघात 
पतौडी यांनी डिसेंबर 1961 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. कसोटी पदार्पणाच्या सहा महिन्यांनंतर म्हणजे जवळपास जून 1962 मध्ये त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना आपला उजवा डोळा गमवावा लागला होता.

मंसूर अली खान पतौडी यांची क्रिकेट कारकिर्द
जर पतौडी यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 1961 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला होता. पुढे 1975 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्याने त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला. दरम्यान त्यांनी 46 कसोटी सामन्यात 2793 धावा केल्या होत्या. यात 6 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश होता. सोबतच नाबाद 203 धावांची सर्वोच्च धावसंख्याही त्यांनी केली होती.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल 310 प्रथम श्रेणी खेळत 15425 धावांची कामगिरी त्यांनी केली होती. यात 33 शतके आणि 75 अर्धशतकांचा समावेश होता. देशांतर्गत क्रिकेटमधील अ दर्जाच्या सामन्यात त्यांना खास आकडेवारी नोंदवता आली नाही. 7 अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात त्यांनी एका अर्धशतकासह 210 धावा केल्या होत्या.

पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते
मंसूर अली खान पतौडी यांना क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक समजला जाणारा अर्जुन पुरस्कार मिळाला होता. 1964 मध्ये या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त 1967 मध्ये त्यांना भारतातील मानाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या दिग्गजाने 22 सप्टेंबर 2011 रोजी जगाचा निरोप घेतला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अमरावतीचा पठ्ठ्या टीम इंडियात! सॅमसनच्या दुखापतीनंतर मिळाली संधी
मिलरने सोडला नव्या वर्षाचा संकल्प! म्हणाला, “यंदा काहीही होवो फक्त…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---