वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आपल्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी सध्या क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. बळी मिळवल्यानंतर चार पावले चालत ड्रेसिंग रूमकडे पाहून तो एक कडक सॅल्यूट मारतो. या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमुळे तो अनेक क्रिकेटचाहत्यांचा त्यांचा आवडता खेळाडू बनला आहे. त्याच कॉट्रेलचा आज वाढदिवस.
“जमैका डिफेन्स फोर्स” चा सैनिक असलेला शेल्डन कॉट्रेल आवड म्हणून क्रिकेट खेळू लागला होता. शाळेत असताना त्याचे क्रिकेट बद्दलचे प्रेम वाढीस लागले. जेव्हा तो कॉलेजमध्ये दाखल झाला तेव्हा त्याच्या प्रशिक्षकांनी पाहिले की, हा मुलगा खूप वेगवान चेंडू टाकतोय मात्र चेंडू टाकल्यानंतर तो दरवेळी घसरतो. त्यावेळी, त्याच्या प्रशिक्षकांनी गुपचुप त्याला बॉलिंग शूज आणून दिले. त्यानंतर कॉट्रेलच्या क्रिकेट प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
ज्युनियर कॉलेजचे शिक्षण पूर्ण होताच, शेल्डनने आईकडे पोलीस किंवा सैन्यात भरती होण्याचा मनोदय बोलून दाखवला. त्यामागे एकच कारण होते की, ज्या आईने त्याला लहानाचे मोठे केले तिला, सुखात ठेवणे. त्यानंतर, शेल्डन “जमैका डिफेन्स फोर्स” मध्ये भरती झाला. त्याने आपल्या देशाच्या सैन्यासाठी ११ वर्ष दिली. यादरम्यान तो नियमीतपणे क्रिकेट खेळत होता.
२०१३ च्या भारत दौऱ्यावर कसोटी संघात त्याची निवड झाली. सचिनची अखेरची मालिका असलेल्या, त्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कोलकाता येथे त्याने, वेस्ट इंडीजची मरून टोपी डोक्यावर चढवली. त्याच सामन्यात, चेतेश्वर पुजाराला बाद करत, त्यांनी आपले ” सॅल्यूट सेलिब्रेशन ” सर्वप्रथम दाखवले. त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द म्हणावी तशी लांबली नाही. तिथून पुढे तो फक्त एक कसोटी खेळू शकला.
कसोटी क्रिकेटमध्ये, त्याला नजरअंदाज केल्यानंतर त्याने आपले सर्व लक्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे वळवले. अँटिंगा हॉकबिल्ससाठी २०१४ सीपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्याने त्याची निवड वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय व टी२० संघात झाली. तिथून पुढे तो सतत संघाच्या आतबाहेर होत राहिला.
२०१८ मध्ये सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स संघासाठी सीपीएल गाजवल्यानंतर खऱ्या अर्थाने शेल्डन कॉट्रेल या नावाची चर्चा नव्याने सुरू झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याचा वेग पाहून थक्क झाले. याच काळात त्याचे “सॅल्यूट सेलिब्रेशन” गाजले.
२०१९ चे वर्ष कॉट्रेलसाठी सुवर्णवर्ष ठरले. २०१९ क्रिकेट विश्वचषक त्याने आपल्या गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाने गाजवले. विश्वचषकातील ९ सामन्यात १२ बळी घेत तो वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर, डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात इलेव्हन पंजाब संघाने त्याला तब्बल साडे आठ करोड रुपयात खरेदी केले.
कॉट्रेलने वेस्ट इंडीजसाठी आत्तापर्यंत ३५ एकदिवसीय व २७ टी२० सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे ४९ आणि ३६ बळी त्याच्या नावे आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ५.२० व ७.३० इतका किफायतशीर आहे.
कालपासून सुरू झालेल्या, सीपीएल २०२० मध्ये तो सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला दिसतोय. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळताना तो सर्व क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसेल.