भारतीय क्रिकेटचा मॉर्डन एरातील ‘द वॉल’ अशी ओळख मिळवणाऱ्या चेतेश्वर पुजारा बुधवारी (25 जानेवारी) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाने मिळवलेल्या अनेक अविस्मरणीय कसोटी विजयांमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. यात सलग दोनदा ऑस्ट्रेलियन भूमीत मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाचा समावेश आहे. दोन्ही वेळेस पुजाराची कामगिरी महत्त्वाची ठरली होती.
त्याने आजपर्यंत भारताकडून 98 कसोटी सामन्यातील 168 डावात खेळताना 44.39च्या सरासरीने 7014 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 19 शतकांचा आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे.
चेतेश्वर पुजाराबद्दल काही खास गोष्टी
-पुजाराचा जन्म 25 जानेवारी, 1988 मध्ये गुजरातच्या राजकोट येथे झाला आहे.
-त्याच्या कुटुंबातच क्रिकेटची पार्श्वभूमी होती. त्याचे वडील अरविंद पुजारा हे सौराष्ट्रकडून 6 प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. यात त्यांनी 172 धावा केल्या होत्या. तसेच पुजाराचे काका बिपीन पुजारा हे देखील सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळले आहे. त्यांनी 36 सामन्यात 1631 धावा केल्या आहेत.
-पुजारा अडीच वर्षांचा असताना त्याच्यातील क्रिकेटचे कौशल्य त्याच्या वडिलांच्या लक्षात आले. त्याचा भावंडांबरोबर क्रिकेट खेळतानाचा फोटो पाहून त्याचा फलंदाजीतील बॅलन्स चांगला असल्याचे त्याच्या वडिलांनी हेरले.
👕 ➝ 75 Tests
🏏 ➝ 5740 runs
🅰️ ➝ 49.48 average
💯 ➝ 18 centuriesPlayer of the Series in India's historic Test triumph in Australia last year 🏅
Happy birthday, Cheteshwar Pujara! 🎂 pic.twitter.com/vjiQ5CtOEt
— ICC (@ICC) January 25, 2020
-सुरुवातीला पुजाराने अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेटची सुरुवात केली होती. पण नंतर भारताचे माजी क्रिकेटपटू केरसन घावरी यांनी त्याच्या वडिलांना पुजाराने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले.
-पुजारा 10 वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला उन्हाळ्यात मुंबईला घेऊन आले. त्यावेळी त्यांना काही खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तो एका आठड्यात तीन सामने आणि महिन्यात 12 सामने खेळायचा.
-2001 मध्ये 12 वर्षांचा असताना पुजाराने 14 वर्षांखालील सौराष्ट्र संघाकडून खेळताना बडोदा विरुद्ध 306 धावांची खेळी केली होती. ही खेळी पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली, असे पुजारा म्हणतो.
-पुजाराने त्याचे शालेय शिक्षण विराणी स्कूलमधून घेतले आहे. याच शाळेतून त्याचे मार्गदर्शक केरसन घावरी यांनी देखील शिक्षण घेतले आहे.
-युवा क्रिकेट गाजवत असताना पुजाराला 2005 मध्ये त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाल्याने मोठा धक्का बसला. त्याची आई म्हणाली होती, तो जेव्हा भारतीय संघात सामील होईल, त्यानंतर त्याला थांबवणे कठीण आहे.
-2006 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळताना पुजारा स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 6 डावात 117 च्या सरासरीने 349 धावा केल्या होत्या. मात्र त्यावेळी भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.
An epitome of class, composure and technique, here's wishing #TeamIndia batsman @cheteshwar1 a very happy birthday🎂 #HappyBirthdayPujara pic.twitter.com/PjhjXYEWhH
— BCCI (@BCCI) January 25, 2020
-पुजाराला 2010 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पहिल्यांदा जागा मिळाली होती. त्याला या दौऱ्यात दुसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात दुखापतग्रस्त गौतम गंभीरच्या ऐवजी जागा मिळाली होती. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 74 धावा केल्या होत्या.
-2013 मध्ये आयसीसीकडून पुजाराला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.
-पुजाराने आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-पुजारा काऊंटी क्रिकेटमध्ये डर्बिशायर संघाकडूनही क्रिकेट खेळला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडला वनडेत व्हाईट वॉश देताच रोहितची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो आम्ही…’
आयपीएल लिलावात सव्वा तेरा कोटी मिळालेला ‘मिलेनियर’ ब्रुक म्हणतोय, “मी पैश्यांसाठी…”