इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सामना सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच न्यूझीलंडचा अनुभवी यष्टीरक्षक बीजे वॉटलींग याने पाठीच्या दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली.
दोन्ही संघात केले गेले बदल
दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळला गेला होता. हा सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंड ने संघात एक बदल केला. निलंबित केला गेलेला वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याच्या जागी ओली स्टोन याला संधी देण्यात आली. दुसरीकडे न्युझीलंड संघात चार बदल केले गेले. कर्णधार केन विलियम्सन, अष्टपैलू मिचेल सॅंटनर व यष्टीरक्षक बीजे वॉटलींग दुखापतीमुळे सामन्याला मुकले. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदी याला विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी अनुक्रमे विल यंग, एजाज पटेल, टॉम ब्लंडल व मॅट हेन्री यांना संधी दिली गेली. न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे.
बीजे वॉटलींगची ऐनवेळी माघार
आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेला न्यूझीलंडचा अनुभवी यष्टीरक्षक बीजे वॉटलींग याने सामना सुरू होण्यास काही वेळ शिल्लक असताना माघार घेतली. त्याला अचानकपणे पाठीचा त्रास होऊ लागल्यामुळे विश्रांती देऊन युवा यष्टीरक्षक टॉम ब्लंडलला खेळविण्यात आले. वॉटलींग याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.
अशी राहिली आहे कारकीर्द
सध्या ३५ वर्षाच्या असलेल्या बीजे वॉटलींग याने आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७४ कसोटी, २८ वनडे व ५ टी२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने कसोटीत २६२ झेल व ८ यष्टीचीत केले आहेत. तसेच त्याच्या नावे ३७८९ कसोटी धावा असून यामध्ये ८ शतके व १९ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रिषभ पंत खूप जास्तच आत्मविश्वासी आहे,’ पाहा असे का म्हणाले न्यूझीलंडचे प्रशिक्षक
‘हिटमॅन’ का अजून कसोटीमध्ये झाला नाही यशस्वी? माजी पाकिस्तानी क्रिकेटरने सांगितले कारण