पॅरिस ऑलिम्पिक येत्या 26 जुलैपासून सुरु होऊन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. टोकियो येथे झालेल्या शेवटच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं चमकदार कामगिरी करत एकूण 7 पदकं जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकं जिंकली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक महिला आमदार सहभाग घेऊन इतिहास रचणार आहे.
बिहारच्या जमुईची आमदार श्रेयसी सिंह यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. श्रेयसी सिंह अवघ्या 33 वर्षांची आहे. ती ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली आमदार ठरणार आहे. श्रेयसी सिंह पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजी स्पर्धेत सहभागी होईल. आमदार झाल्यानंतर आता तिच्यावर भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याची जबाबदारी आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये श्रेयसी सिंहची महिलांच्या शॉटगन ट्रॅप स्पर्धेत निवड झाली आहे. विशेष म्हणजे ती ऑलिम्पिकसाठी निवड झालेली बिहारची पहिली ॲथलीट ठरली आहे. श्रेयसी सिंहनं 2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं. त्याच वर्षी तिनं शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत इंचॉन येथील 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. तर 2018 मध्ये श्रेयसीनं ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होते. त्याच वर्षी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
श्रेयसी सिंह 2020 मध्ये भाजपमध्ये दाखल झाली. पक्षानं तिली जमुई मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ती विजयी झाली. श्रेयसी सिंह हिचा जन्म 29 ऑगस्ट 1991 रोजी नवी दिल्ली येथे झाला. तिनं दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी आणि मानव रचना विद्यापीठ, फरीदाबादमधून एमबीए पूर्ण केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहित शर्मानंतर हा खेळाडू भारतीय संघाचा कर्णधार व्हावा”, वीरेंद्र सेहवागनं थेटच सांगितलं
टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान
संसदेतही रोहित शर्माच्या नावाचा जयघोष, अध्यक्षांसह संपूर्ण सभागृहानं केलं अभिनंदन