fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ब्लॉग: प्रो कबड्डीतले ‘ओल्ड हॉर्सेस’

– शारंग ढोमसे

प्रो कबड्डीच्या या हंगामातला सर्वात जोशपूर्ण झालेला सामना म्हणजे जवाहरलाल नेहरु इंडोर स्टेडियम मध्ये रंगलेला जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तामिळ थलाईवाजचा सामना.

‘आईस मॅन’ अजय ठाकुरच्या डोक्यावरचा बर्फ कधीच वितळून गेला होता. स्वाभिमान दुखावलेल्या जखमी वाघासारखा अजय त्या सामन्यात खेळत होता. पण जयपूरचे पँथर्स त्या दिवशी त्याला पुरून उरले होते. जयपूर ने हा सामना २८-२६ अशा नाममात्र फरकाने जिंकला.

हा सामना इतका जोशपूर्ण झाला आणि अजयचा संयम या सामन्यात सुटला याला एक कारण होते.सामना सुरू होण्यापूर्वी नेहमीच बेधडक वक्तव्य करणारे जयपूरचे प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी अजून एक खरमरीत विधान केले होते. तमीळ थलाईवाजच्या खेळाडूंना त्यांनी ‘ ओल्ड हॉर्सेस’ असे संबोधले. म्हणजे राहुल, अजय, मंजित हे जरी मोठे खेळाडू असले तरी आता ते जुने झाले आहेत असा त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता.

थलाईवाजना विशेषतःअजयला हे विधान चांगलेच झोंबले होते.रेड्डी यांनी हे विधान का केले हा वेगळा विषय मात्र त्यांच्या विधानात अजिबातच तथ्य नाही असे नाही. रेड्डी यांच्या या ओल्ड हॉर्सेसच्या या हंगामातील कामगिरीवर एक नजर टाकल्यास त्यांच्या विधानात खरंच तथ्य आहे हे कोणीही सांगेल.

प्रो कबड्डीच्या महाभारतातील राहुल पर्वाचा अंत?

कबड्डीचा पोश्टर बॉय, समालोचकांचा ‘शोमॅन’, प्रो कबड्डीतल्या सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळाडूंपैकी एक राहुल चौधरी! प्रो कबड्डीच्या पहिल्याच हंगामात राहुलने जवळ जवळ ११च्या सरासरीने केवळ १४ सामन्यांत १५१ गुणांचा रतीब लावला. मात्र प्रत्येक हंगामागनिक त्याची सरासरी कमी होत गेली.

आपल्या जोरदार चढायांनी विपक्षी संघात अक्षरशः खळबळ माजवणारा राहूल कुठे आणि आता एका एका गुणासाठी झटणारा राहुल कुठे! खरंतर राहुलच्या पदलालित्यात असेलला वेग आणि दोन्ही बाजूने चढाई करण्याचे कौशल्य फार कमी खेळाडूंकडे असते पण मोक्याच्या क्षणी कच खाण्याची त्याची सवय आणि सामन्याच्या परिस्थिती प्रमाणे खेळ करू शकण्याची असमर्थता राहुलला परदिप, पवन यांच्या तुलनेत मागे ठेवते.

सातव्या हंगामात तर राहुल पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्याच्या प्रो कबड्डी कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी त्याची या हंगामात झाली. पहिल्या हंगामातील त्याची ११ ची सरासरी आता केवळ ६ वर येऊन ठेपली आहे, यातच त्याच्या ढासळलेल्या कामगिरीचा अंदाज येईल. परदिप, पवन हे खेळाडू आपल्या जुन्या अस्त्रांना धारदार ठेवण्याबरोबरच आपल्या भात्यात नव-नवीन अस्त्रांचा समावेश करत राहिले आणि त्यामुळेच ते या स्पर्धेत अजूनही टिकून आहेत.

राहुल मात्र असे करण्यात अपयशी ठरला असे म्हणता येईल त्यामुळे प्रो कबड्डीच्या महाभारतातील ‘राहुल पर्वाचा’ अंत झालाय का अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.

मंजित छिल्लरचा शेवटचा हंगाम?

जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू अशी बिरुदावली मिळालेला आणि एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाच्या नायकाप्रमाणे कुठलाही सामना एकाहाती फिरवण्याची किमया लिलया साधणाऱ्या ‘मायटी मंजित’ चा माईट आता पहिल्या सारखा राहिला नाही. मंजितच्या स्वभावातली आक्रमकता त्याच्या खेळात नेहमीच दिसत आलेली आहे.  मंजितला सगळे सामने स्वतःच्या जोरावर जिंकायची असतात. खरं तर त्याची ही आक्रमकता आणि जिंकण्याची महत्वकांक्षाच त्याला इथपर्यंत घेऊन आलीये. मात्र वेळ आणि काळ नेहमी सारखा नसतो. मंजितही त्याला अपवाद नाही.

त्यामुळे त्याच्या खेळावर वयानुसार मर्यादा आल्या आहेत. पण त्याने त्या स्वीकारलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे अजूनही ‘मी म्हणेन तीच पूर्वदिशा’ हा दृष्टिकोन त्याने सोडलेला नाही. तामिळ थलाईवाजचे प्रशिक्षक ई.भास्करण यांनीही अनेक वेळा मंजितच्या अशा वागण्याबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. ते जरी स्पष्टपणे बोलले नसले तरी थलाईवाजचं प्रशिक्षकपद चालू हंगामतच सोडण्यामागे मंजितचे असे वागणेही एक कारण असू शकते.

त्यामुळे या पुढे कुठलाही संघ मंजितचा समावेश करतांना १०० वेळा विचार करेल. मंजितसारख्या मोठ्या खेळाडूने खरंतर आता सन्मानाने निवृत्त झाले पाहिजे. नाहीतर पुढल्या हंगामात कोणताही संघ त्याच्यावर बोली न लावण्याची दाट शक्यता आहे. मंजित सारख्या महान खेळाडूवर ही नामुष्की येऊ नये हीच इच्छा!

अजय ठाकुर पुनरागमन करेल?

सातव्या हंगामात सगळ्यात जास्त निराशा कोणत्या खेळाडूने केली असेल तर ती अजय ठाकूरने केली. एक तर अजय आपल्या नैसर्गिक खेळाच्या विरुद्ध जाऊन खेळला. राहुल संघात असल्यामुळे त्याने आपल्या मूळ आक्रमकतेला लगाम घालत या हंगामात हातचं राखून खेळ केला असं सातत्याने जाणवलं आणि त्याचाच फटका त्याला बसला.

त्याची सरासरी ९.२२ वरून अगदी ४.४६ वर घसरली.पण अजय ठाकूर हा पुनरागमन करण्यात माहीर आहे. या आधीही ३ ऱ्या आणि ४ थ्या हंगामात त्याची कामगिरी खालावली होती. मात्र त्याने ५ व्या हंगामात दिमाखदार कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे पुढच्या हंगामात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा बाळगणे गैर होणार नाही!

एकंदरीतच नव्या दमाच्या खेळाडूंनी जुन्या खेळाडूंची जागा घेणे ही कुठल्याही खेळाची रीतच आहे.फक्त रेड्डी यांचे हे ओल्ड हॉर्सेस पुन्हा उभारी घेऊन मैदान गाजवतात का हाच प्रश्न राहतो!

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘शिवनेरी सेवा मंडळ’आयोजित कबड्डी स्पर्धाचा थरार आजपासून

‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम

You might also like