क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खूप सारे गमतीशीर प्रसंग उद्भवत असतात. कधी एखादा प्राणी आतमध्ये येऊन खेळ थांबवतो. एखादवेळी वीज जाणे, खेळाडू बाहेर जाणे, तत्सम कारणांनी प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे देखील मनोरंजन होते. परंतु, संघाच्या कर्णधाराच्या चुकीमुळे दोन्ही संघ क्षेत्ररक्षणाला मैदानात उतरण्याची घटनादेखील घडलेली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ १९६७ मध्ये साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियन संघाची धुरा महान खेळाडू बॉबी सिंपसन यांच्या हाती होती. त्यावर्षी, ऑस्ट्रेलियन संघ तितकासा मजबूत वाटत नव्हता. दुसरीकडे, पीटर व्हन डर मर्व यांच्या नेतृत्वात आफ्रिका संघ जरासा सरस बनला होता.
नुकत्याच संपलेल्या चौथ्या कसोटीत आफ्रिकेच्या ट्रेवर गोडार्ड यांनी आपल्या संघासाठी ४७ धावा आणि सहा बळी मिळवले होते. यष्टीरक्षक म्हणून खेळणारे डेनिस लिंडसे यांनीदेखील त्या कसोटीत मालिकेतील आपले तिसरे शतक झळकावलेले. माइक प्रॉक्टर या युवा वेगवान गोलंदाजांने ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. दुसऱ्या कसोटीत ग्रॅम पोलॉक यांनी द्विशतक झळकावून आफ्रिकन फलंदाजीची जबाबदारी उचलली होते. एकूणच यजमान आफ्रिकन टीम ऑस्ट्रेलियाला सगळ्याच बाबतीत जड जात होती.
ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत २-१ ने मागे होता. कर्णधार सिंपसन यांची चिंता वाढत होती. खेळाडूंचा फॉर्म देखील खराब होत चालला होता. सिंपसन स्वतः उत्तम फॉर्मात होते. परंतु, क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने एकटा गडी किती रहाट ओढणार.
पाचव्या सामन्याआधी डिबियर्स स्टेडियम, किंबर्ली येथे ग्रिक्वलँड वेस्टच्या संघाविरुद्ध सराव सामना आयोजित केला गेला होता. ग्रिक्वलँड वेस्टच्या कमकुवत गोलंदाजांनाविरुद्ध सिंपसन यांनी १४१ धावा फटकावल्या. त्यांचा साथीदार बिल लॉरीने १०७ धावा केल्या. लॉरी यांचे दौऱ्यावरील हे पहिलेच शतक होते. सलामी भागीदारी २२७ इतकी होती. त्यानंतर ग्रॅहम थॉमस यांनी १३४ धावांची लयलूट केली. टॉम व्हिव्हर्स यांनी ७२ धावांची भर घातली. पाहुण्यांनी ६२० धावांचा डोंगर उभारला होता. स्लिपमध्ये अर्धा डझन झेल सोडले. ग्रिक्वाचा कर्णधार एरॉल ड्रॅपरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजी देण्याचा निर्णय पूर्णपणे चुकला होता. ऑस्ट्रेलियाने ग्रिक्वाच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करण्याची ग्रिक्वाच्या संघाची ताकत नव्हती. जेम्स हबल आणि जॉनी मार्टिन यांनी ग्रिक्वाचा डाव पाचव्या दिवशी सकाळी सकाळी १७८ धावांवर संपविला.
सामन्याचा शेवटचा दिवस असल्याने ऑस्ट्रेलिया फॉलोऑन देणार हे अगदी स्पष्ट होते. ग्रिक्वाचा पहिला डाव संपल्यानंतर दोन्ही संघ तंबूत परतले आणि चर्चा झाल्यानंतर सिंपसन आपला संघ घेऊन पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आले. त्याचसोबत पुढच्या काही मिनिटांत, ड्रॅपर आणि त्यांचा संघ देखील मैदानात उतरला.
त्याचे झाले असे की, सिंपसन यांनी गृहीत धरले होते की, आता ग्रिक्वाचा संघ परत फलंदाजीला येईल. त्यामुळे ते ग्रिक्वाचे कर्णधार ड्रॅपर यांना फॉलोऑन बाबतीत सांगायचे विसरले.
नियमानुसार, विरोधकांना फॉलोऑनचा निर्णय न सांगितल्याने, ऑस्ट्रेलियाला पुन्हा फलंदाजीसाठी बाहेर पडावे लागले. ग्रॅमी वॉटसन आणि ब्रायन टॅबर फलंदाजीला आले आणि अर्ध्या तासासाठी फलंदाजी करत २५ धावा ठोकल्या. यानंतर, सिंपसन यांनी डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडे ग्रिक्वाचा डाव संपवायला तीन तास शिल्लक राहिले.
ऑस्ट्रेलियाला ग्रिक्वाचा डाव गुंडाळायला अवघा १ तास ४० मिनिट इतका वेळ लागला. जॉनी मार्टिनने आपल्या चायनामन गोलंदाजीने ३० धावा देऊन ७ गडी बाद केले आणि यजमान ३१.४ षटकांत ९१ धावांवर सर्वबाद झाले.
सिंपसन यांच्यासारख्या क्रिकेटची उत्कृष्ट जाण असणाऱ्या खेळाडूकडून अशी चूक झाली आणि त्यानंतर हा किस्सा अनेकदा त्यांच्या सहकाऱ्यांकडून चेष्टा-मस्करीत सांगितला जाऊ लागला.
वाचनीय लेख –
या ३ मैदानात आहेत सीमारेषेच्या आत झाड, ज्यामुळे बदलावे लागले क्रिकेटचे नियम






