भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मोठी घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सोमवारी याची घोषणा केली.
कसोटी क्रिकेटमध्ये 32 वर्षांनंतर या दोन देशांदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी 1991-92 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या 2024-25 च्या वेळापत्रकाचं मुख्य आकर्षण असेल. मालिकेचं वेळापत्रक येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सोशल मीडिया ‘X’ वर पोस्ट केलं, “1991-92 नंतर प्रथमच, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका या उन्हाळ्यात खेळली जाईल. ही मालिका 2024-25 च्या देशांतर्गत वेळापत्रकाचं मुख्य आकर्षण असेल.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, “बीसीसीआय कसोटी क्रिकेटचा समृद्ध वारसा जपण्यासाठी समर्पित आहे. हे असं स्वरूप आहे ज्याचा आम्ही सर्वात जास्त आदर करतो. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पाच कसोटी सामन्यांपर्यंत वाढवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतचं आमचं सहकार्य हे कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यासाठी आमची सामूहिक बांधिलकी दर्शवते.”
या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जाऊ शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेयर्ड म्हणाले, “या दोन देशांमधील तीव्र स्पर्धा पाहता, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आता पाच कसोटी सामन्यांपर्यंत करण्यात आल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.”
2020-2021 दरम्यान भारतीय संघ शेवटचा ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये 4 कसोटी सामने, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले गेले होते. कसोटी मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 8 विकेट्सने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं पुनरागमन करत 8 गडी राखून विजय मिळवला. तिसरा सामना अनिर्णित राहिला. चौथ्या सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकता आली असती, मात्र ऋषभ पंतच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारतानं हा सामना 3 विकेटनं जिंकला आणि मालिका खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीनं रचला आणखी एक इतिहास, सुरेश रैनाचा जुना विक्रम मोडला
विराट कोहलीला भेटण्यासाठी काहीही! मैदानाची सुरक्षा मोडून चाहता थेट क्रीजवर, पाहा VIDEO