न्यूझीेलंड विरुद्ध भारत संघातील पाच सामन्यांची वनडे मालिका रविवारी(3 फेब्रुवारी) पार पडली. ही मालिका भारताने 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर आज(4 फेब्रुवारी) आयसीसीने वनडे क्रमवारी जाहिर केली आहे.
या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी चांगली प्रगती केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह हे भारतीय क्रिकेटपटू अव्वल क्रमांकावर कायम आहेत. तसेच रोहित शर्मा फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
त्याचबरोबर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने क्रमवारीत सुधारणा केली आहे. त्याची या क्रमवारीत 3 स्थानांनी प्रगती झाली असून तो 17 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने मागील महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग तीन सामन्यात तीन अर्धशतके केली होती.
तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये स्थान मिळवताना 7 स्थानांची सुधारणा करत तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने भारताविरुद्ध 12 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो भारत-न्यूझीलंडमधील वनडे मालिकेतील सर्वाधिक विकेट्सही घेणारा गोलंदाज आहे.
या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनेही एका स्थानाची सुधारणा करत पाचवे स्थान मिळवले आहे. तसेच कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये 3 भारतीय गोलंदाज आहेत.
गोलंदाजांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही सहा क्रमांकाची झेप घेत 17 वे स्थान मिळवले आहे.
याचबरोबर फलंदाजांच्या क्रमवारीत केदार जाधवनेही 8 क्रमांकाची प्रगती केली आहे. तो आता 35 व्या क्रमांकावर आला आहे.
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेबरोबर दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती-नेपाळ यांच्यातही वनडे मालिका सुरु होती. त्यामुळे या मालिकांचाही या क्रमवारीत विचार करण्यात आला आहे.
फलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटॉन डीकॉक 9 व्या क्रमांवरुन 8 व्या क्रमांकावर आला आहे. तर हाशिम आमला 3 क्रमांकाची प्रगती करत 13 व्या क्रमांकावर आला आहे आणि रिझा हेन्ड्रीक्सने तब्बल 36 स्थानांची झेप घेत 94 वे स्थान मिळवले आहे. तसेच पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हकने कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. तो 16 व्या स्थानावर आला आहे.
गोलंदांजांमध्ये अँडील फेहलूकवायोने 13 क्रमांकाची सुधारणा करत 19 वे स्थान मिळवले आहे आणि ड्वेन प्रेटोरियन 53 व्या स्थानावरुन 44 व्या स्थानावर आला आहे.
अशी आहे संघ क्रमवारी-
संघ क्रमवारीत न्यूझीलंडला भारताविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने त्यांची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर भारताने 122 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. आता भारत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडपेक्षा फक्त 4 गुणांनी मागे आहे.
या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे आणि न्यूझीलंडचे 111 असे सारखे गुण आहेत पण आफ्रिकेने दशांश गुणांची न्यूझीलंडला मागे टाकले आहे. तसेच पाचव्या स्थानावर 102 गुणांसह पाकिस्तान आहे. तर नेपाळ 15 व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ
–मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज
–कोहली-रोहितच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम