भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या संघर्षाची कहाणी संपूर्ण जगाला माहीत आहे. आजही गल्लीबोळातील अनेक क्रिकेटपटू धोनीसारखं बनण्याचं स्वप्न पाहत असतात.
रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात विदर्भातील एका गोलंदाजानं आपल्या घातक गोलंदाजीनं वर्चस्व गाजवलं. विशेष म्हणजे हा गोलंदाज महेंद्रसिंह धोनीला आपला गुरु मानतो. याचं नाव आहे यश ठाकूर.
सध्या रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होत आहे. विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना 41 वेळचा चॅम्पियन मुंबई संघ पहिल्या डावात 224 धावांत सर्वबाद झाला. विदर्भ संघाकडून स्टार गोलंदाज यश ठाकूरनं धारदार गोलंदाजी करत मुंबई संघाचा पार बँड वाजवला. यशनं पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत 1 बळी घेतला आहे.
यश ठाकूरनं पहिल्या डावात सलामीवीर भूपेन लालवानी, तुश कोटियन आणि शम्स मुलाणी यांना बाद केलं. यानंतर त्यानं दुसऱ्या डावात पृथ्वी शॉला आपल्या जाळ्यात अडकवलं. यशनं 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीला क्लिन बोल्ड केले. त्यानं टाकलेला हा चेंडू इतका अप्रतिम होता की शॉचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की तो बोल्ड झाला आहे.
यशनं एका मुलाखतीत सांगितलं की, शिबिरासाठी निवड झाल्यानंतर व्हीसीए अकादमीमध्ये तो पहिल्या दिवशी उमेश यादवला भेटला होता. यशनं सांगितले की तो त्याच्याकडून फार प्रभावित झाला. त्याला उमेशच्या पावलावर पाऊल टाकून भारतासाठी खेळायचं होतं. यशचं स्वप्न आधी उमेशसारखी गोलंदाजी करणं आणि नंतर त्याच्यासोबत गोलंदाजी करण्याचं होतं.
याशिवाय यशनं त्याचे प्रशिक्षक हिंगणीकर यांचा एक प्रसंग आणि संवाद सांगितला. एकदा यश नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या प्रशिक्षकानं त्याला पाहिलं आणि त्याला कधीही विकेट-कीपिंग ग्लोव्ह्ज घालू नको असं सांगितलं. यावर त्यानं लगेच प्रशिक्षकाला उत्तर दिलं की त्याला एमएस धोनीसारखं व्हायचं आहे.
यश पुढे म्हणाला की, सरांनी मला सांगितले, यष्टिरक्षणाशिवाय धोनीचं अनुकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांनी मला धोनीकडून खेळाचे इतर पैलू शिकण्यास आणि गोलंदाजी करताना ते लागू करण्यास सांगितलं. माझ्यासाठी तो टर्निंग पॉइंट होता, असं त्यानं शेवटी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
सात्विक-चिराग जोडीनं जिंकली फ्रेंच ओपन स्पर्धा, तैवानच्या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव
विराट कोहलीची आरसीबीसोबत 16 वर्ष पूर्ण, एक नजर त्याच्या कारकिर्दीवर