भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच 4 सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका पार पडली आहे. या मालिकेतील ब्रिस्बेन येथील शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेत आपले पदार्पण करणाऱ्या मोहोम्मद सिराजने उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे. अशातच भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची प्रतिक्रिया समोर येत असून त्यांनी, सिराजची क्षमता कशा प्रकारे ओळखली याची माहिती दिली आहे.
भरत अरुण म्हणाले, “सिराजला मी आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळतांना बघितले होते. मी त्यावेळी लक्ष्मण यांना म्हणालो होतो की हा युवा गोलंदाज उत्तम कामगिरी करत आहे. लक्ष्मण यांनीही होकार दर्शवला. मात्र, सिराजला त्यावर्षी जास्त संधी मिळाल्या नाहीत.”
अरुण पुढे म्हणाले, “जेव्हा मी हैदराबाद संघाचा प्रशिक्षक बनलो, तेव्हा मी सिराजला पुन्हा बोलवून घेतले. तेव्हा देखील सिराज संभावित खेळाडूंमध्ये नव्हता. मी पुन्हा त्याला गोलंदाजी करताना बघितल्यानंतर त्याने मला पहिल्यापेक्षाही अधिक प्रभावित केले. सिराजला बघितल्यानंतर मला जाणवले की त्याच्यामध्ये जिद्द व क्षमता आहे. माझ्या लक्षात आले की या खेळाडूला नक्कीच खेळवले गेले पाहिजे.”
सिराजची स्तुती करताना अरुण म्हणाले, “सिराजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला जो सल्ला दिला जाईल तो त्याच प्रकारे गोलंदाजी करतो. जेव्हा तो भटकतो तेव्हा मी त्याला रागाने देखील समजावून सांगतो. सिराजची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.”
मोहम्मद सिराजने मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यापासूनच सिराजने उत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थित सिराज हा भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. ब्रिस्बेन येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात सिराजने 5 बळी घेण्याचा कारनामा केला. सिराजने या सामन्यात 150 धावा देत 7 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत सिराजने 3 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो”, मोहम्मद शमीची वडिलांसाठी भावूक पोस्ट
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीचे चेन्नईत आगमन; फोटो व्हायरल