Boxing Day Test, INDvsSA: कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. खरं तर, 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सामन्यांना बॉक्सिंग डे म्हटले जाते. मात्र, बॉक्सिंग डे टेस्ट असते तरी काय? हेच आपण जाणून घेऊयात…
बॉक्सिंग डे 26 डिसेंबरला का साजरा केला जातो?
ख्रिसमसच्या एक दिवसानंतर अनेक देशात बॉक्सिंग डे (Boxing Day) साजरा केला जातो. लोक यादिवशी आपल्या जवळच्या लोकांना भेटवस्तू देतात. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी त्या लोकांना भेट देण्याची परंपरा आहे, जे सणाच्या दिवशी सुट्टी न घेता काम करतात. त्यामुळे याला बॉक्सिंग डे म्हटले जाते. खरं तर, बॉक्सिंग डे ते देश साजरा करतात, जे कधीकाळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते. सर्वप्रथम ही परंपरा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात साजरी केली गेली होती. यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियासह कॅनडा, नायजेरिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांसारख्या देशातही साजरा केला जाऊ लागला.
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला बॉक्सिंग डे सामना
चाहत्यांना नेहमीच रंजक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. अशात त्यांना हेही जाणून घ्यायचे असते की, क्रिकेट इतिहासातील पहिला बॉक्सिंग डे सामना केव्हा आणि कोणत्या संघांमध्ये खेळला गेला होता. याचे उत्तर आहे, पहिला बॉक्सिंग डे सामना 1968 साली वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) संघात खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया संघ सन 1980पासून प्रत्येक बॉक्सिंग डेला एक कसोटी सामना आयोजित करत आला आहे.
भारतीय संघाने पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना केव्हा खेळला?
रंजक बाब अशी की, भारतीय संघानेही अनेक बॉक्सिंग डे सामने खेळले आहेत. भारताने आपला पहिला बॉक्सिंग डे टेस्ट (Indian Team Boxing Day Test) सन 1985मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. दोन्ही संघात यादरम्यान मेलबर्नमध्ये सामना झाला होता. त्यावेळी भारताचे नेतृत्व कपिल देव यांच्याकडे होते. या सामन्याच्या निकालाविषयी बोलायचं झालं, तर हा सामना अनिर्णित राहिला होता.
बॉक्सिंग डे कसोटीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाची आकडेवारी
बॉक्सिंग डे निमित्त भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने 2 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ बाजी मारण्यात यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, भारताने आतापर्यंत बॉक्सिंग डेला एकूण 17 कसोटी सामन्यात भाग घेतला आहे. यादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियात सर्वाधिक 9 सामने खेळले आहेत. त्यातील 2 सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (boxing day test history india vs south africa 1st test match know about boxing day test here)
हेही वाचा-
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उस्मान ख्वाजाला कर्णधार पॅट कमिन्सचा पाठिंबा, म्हणाला, ‘आयसीसी जे नियम बनवते ते…’
IND vs SA: दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वी रोहितचं मोठं विधान; म्हणाला, ‘मी खूप मेहनत केली आहे, मला काहीतरी…’,