बांग्लादेश संघाचा खेळाडू मशर्रफ़ मुर्तझाने बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये शून्य क्रमांकाची जर्सी घातली होती. यावरून आता क्रिकेट जगतात चर्चा रंगली आहे. या आधी हर्शेल गिब्स या क्रमांकाची जर्सी वापरत होते. त्यामुळे सध्या मुर्तझा चर्चेत आहे.
मुर्तझा या स्पर्धेत रंगपूर रायडर्सचे नेतृत्व करतो आहे. त्याने घातलेल्या जर्सीवर शून्य क्रमांकाबरोबरच ‘शून्यापासूनच सुरवात होते’ (starting from scratch) अश्या अर्थाचे वाक्य लिहिले आहे.
मुर्तझाने जेव्हा त्याच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा तो २० क्रमांकाची जर्सी वापरत होता. यानंतर त्याने या क्रमांकातील ० काढून टाकून २ या क्रमांकाची जर्सी वापरायला सुरुवात केली आणि आता त्याने शून्य क्रमांकाची जर्सी घालून एक वर्तुळ पूर्ण केले आहे.
याविषयी तो क्रिकबझशी बोलताना म्हणाला, “मी काही दिवसांपूर्वी हर्शेल गिब्स यांची एक मुलाखत वाचली. ज्याने मला खूप प्रभावित केले. त्यात एक वाक्य असे होते की ‘पुन्हा शून्यापासून सुरुवात करा’ आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या वाक्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मी सुरवातीला २० क्रमांकाची जर्सी वापरत होतो नंतर २ क्रमांकाची आणि आता ० क्रमांकाची जर्सी घालून मी एक वर्तुळ पूर्ण केले आहे.”
याआधीही अश्याच काहीसा प्रकार भारताच्या शार्दूल ठाकूरसोबत झाला होता जेव्हा त्याने १० क्रमांकाची जर्सी घातली होती. त्याने ती अंकशास्त्रानुसार घातली असल्याचे सांगितले होते परंतु या क्रमांकाची जर्सी सचिन तेंडुलकर वापरत होता. त्यामुळे शार्दूलला वादाला सामोरे जावे लागले होते. अखेर त्याने नंतर ५४ क्रमांकाची जर्सी घालायला सुरुवात केली.