---Advertisement---

ब्रॅड इवान्स-ब्लेसिंग मुझारबानीच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली, झिम्बाब्वेचा चकित करणारा विजय

On: शुक्रवार, फेब्रुवारी 13, 2026 2:48 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (शुक्रवार, १३ फेब्रुवारी) पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुरू आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. यामध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. झिम्बाब्वेने २००७च्या विश्वचषकानंतर परत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला आहे. त्यांचे वेगवान गोलंदाज ब्रॅड इवान्स आणि ब्लेसिंग मुझारबानीच्या वेगासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक काळ खेळपट्टीवर टिकलेच नाहीत. ब्लेसिंग मुझारबानीला ‘प्लेयर ऑफ दी मॅच’चा पुरस्कार मिळाला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ट्रेविस हेड याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात झिम्बाब्वे सिंकदर रजाच्या नेतृत्वाखाली खेळला. ब्रेंडन टेलर दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेबाहेर झाला. त्याचा झिम्बाब्वेच्या खेळाडूंवर परिणाम दिसला नाही.

झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेट ५६ चेंडूत ६४ धाव करत नाबाद राहिला. त्याने पहिल्या विकेटसाठी तदिवानाशे मारुमणी याच्यासोबत ६१ धावांची आणि रायन बर्लसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. मारुमणी आणि बर्ल ३५ धावा करत बाद झाले. सिंकदर १३ चेंडूत २५ धाव करत नाबाद राहिला. यामुळे झिम्बाब्वेने २० षटकात दोन विकेट्स गमावत १६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने प्रभावी गोलंदाजी केली, मात्र तोही दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या. त्याने २.५ षटकात १७ धावा देत एक विकेट घेतली.

या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अडखळत सुरूवात झाली. त्यांनी पॉवरप्लेमध्येच ३८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेविड शून्यावर बाद झाले. स्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा हेड केवळ १५ चेंडूत १७ धावा करत बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या या स्थितीमागचे कारण ब्लेसिंग-इवान्स जोडी ठरली. एक बाजूने विकेट्स पडत असताना मॅट रेनशॉने दुसरी बाजू धरून ठेवली आणि ऑस्ट्रेलियाच्या जिंकण्याच्या संधी निर्माण झाल्या. त्याने ग्लेन मॅक्सवेलसह पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली.

मॅक्सवेल ३१ धावा करत बाद झाला. त्याला बर्लने त्रिफळाचीत केले. रेनशॉने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र विकेट्स पडतच राहिल्या आणि तोही ४४ चेंडूत ६५ धावा करत बाद झाला. त्याला मुझारबानीने बर्लकरवी झेलबाद केले.
मुझारबानीने ४ षटकात १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. इवान्सने ३.३ षटकात २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. वेलिंग्टन मसाकादजा आणि बर्लला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दोन सामने खेळले असून त्यामध्ये एक विजय आणि एक पराभव आहे. झिम्बाब्वेने मात्र त्यांचे दोन्ही सामने जिंकले असून ग्रुप बी च्या गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध १६ फेब्रुवारीला आणि झिम्बाब्वेचा पुढील सामना १७ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध आहे.

.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---