आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चे यजमानपद भारताला दिलेलं आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हे सामने युएई आणि ओमानमध्ये आयोजित केले जाणार आहेत. आता २०२१ टी२० विश्वचषक स्पर्धेची तारीख जवळ येत असल्याने अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपली प्रतिक्रिया देखील द्यायला सुरूवात केली आहे. नुकतेच या विश्वचषकात कोणता भारतीय क्रिकेटपटू मालिकावीर ठरु शकतो, याबद्दल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगने भाकीत केले आहे.
या टी२० विश्वचषकची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघात जरी रोहित शर्मा, विराट कोहली किंवा रिषभ पंत असे स्टार खेळाडू असले तरी या विश्वचषकासाठी त्यांच्यापैकी कोणाचेही नाव संभाव्य मालिकावीर म्हणून हॉगने घेतलेले नाही. हॉगच्या मते २०२१ टी२ विश्वचषकात सूर्यकुमार यादव मालिकावीर ठरु शकतो.
आपल्या यूट्यूब चॅनलवर हॉग म्हणाला की, ‘मला असा विश्वास आहे की सूर्यकुमार यादव विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे या स्पर्धेत सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरतील आणि सूर्यकुमार यादव तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात येईल. मला वाटते की, त्याने आपल्या खेळाच्या शैलीत खूप सुधारणा करून घेतली आहे. त्याच्याकडे खेळायला अनेक शॉट्स आहेत. तो लेग साइडला आणि ऑफ साइडला दोन्ही बाजूंनी शॉट्स खेळत असतो. एवढेच नव्हे तर, तो पुढे येऊन खूप चांगले शॉट्सही खेळत असतो.’
त्याचबरोबर हॉग पुढे म्हणाले की, ‘मला असे वाटते की, सूर्यकुमार यादव या स्पर्धेमध्ये सर्वात प्रभावी फलंदाज असेल. जर तो गोलंदाजांवर दबाव टाकण्यास यशस्वी झाला तर भारतीय संघासाठी ही स्पर्धा जिंकवण्यासाठी त्याचे महत्वाचे योगदान असेल. मला वाटते की, सूर्यकुमार यादव हा असा भारतीय खेळाडू असेल, ज्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल. मला वाटते टी२० विश्वचषकात तो मालिकावीर म्हणून देखील निवडला जाईल.’
भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १८ जुलै रोजी श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे ‘मालिकावीर’ पुरस्कार देखील मिळाला आहे. ही त्याची पदार्पणाची एकदिवसीय मालिका होती. तसेच त्याआधी त्याने याचवर्षी इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आशियाई टूरच्या माजी अव्वल गोल्फरची राऊंड १मध्ये उत्तम कामगिरी; मिळवला ८ वा क्रमांक
‘नो लूक थ्रो’! श्रीलंकेच्या गोलंदाजाने यष्टीकडे न पाहताच उडवली दांडी, सर्वांना आठवला धोनी