---Advertisement---

ऑस्ट्रेलियन दिग्गजाला बघायचाय ‘हिटमॅन’चा राग; म्हणाला, ‘रोहितला कठीण जाणारंय…’

On: शनिवार, मार्च 19, 2022 1:35 AM
Cricketer-Rohit-Sharma
---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या ३ सामन्यांच्या टी२० आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. या दोन्ही मालिका जिंकत भारताने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. मात्र, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांना पाहायचे आहे की, भारतीय संघाचा नवीन कर्णधार रोहित दबावाची परिस्थितीत कशाप्रकारे सांभाळतो. त्यांनी रोहितला आगामी सर्व मोठ्या मालिकांसाठी आणि स्पर्धांसाठी चेतावणी दिली आहे.

युएईत पार पडलेल्या टी२० विश्वचषक २०२१नंतर विराट कोहलीने (Virat Kohli) टी२० कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोहित शर्माला (Rohit Sharma) नवीन कर्णधार म्हणून नेमण्यात आले. काही महिन्यांनंतर वनडे संघाचेही कर्णधारपद रोहितवर सोपवण्यात आले. जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराटने कर्णधारपदावरून हटल्यानंतर रोहितला भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, हॉग यांनी रोहितला पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाबाबत मोठी चेतावणी दिली आहे.

हॉग म्हणाले की, “भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने मिळाले आहेत, जे रोहितला कठीण जाणार आहेत. मला त्याला दबावात पाहायचे आहे. तो तितकाच शांत दिसेल की, आम्हाला थोडा रागही पाहायला मिळेल? भारतीय संघासमोर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका, इंग्लंडचा दौरा आणि टी२० विश्वचषक आहे. त्यामुळे रोहितसाठी दबावातील स्पर्धा येत आहेत.”

कर्णधार म्हणून भारतीय संघाला तिन्ही क्रिकेट प्रकारात विजय मिळवून देणारा रोहित शर्मा येत्या २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्याच नेतृत्वात मुंबईने ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे.

रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ४५ कसोटी सामने, २३० वनडे सामने आणि १२५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४६.१३च्या सरासरीने ३१३७ धावा केल्या आहेत. तसेच, त्याने वनडेत ४८.६०च्या सरासरीने ९२८३ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने आंतरराष्ट्रीय टी२०त ३२.४८च्या सरासरीने ३३१३ धावा कुटल्या आहेत. त्याने आतापर्यंत ४१ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---