ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली यानं आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहित आणि विराटनं काही काळ क्रिकेटपासून दूर राहावं, असं ब्रेट ली म्हणाला. तो म्हणाला की, न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर या दोन दिग्गजांनी काही काळ क्रिकेटपासून दूर राहावं आणि 22 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी नव्यानं सुरुवात करावी.
न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीनं 93 धावा केल्या होत्या. तर रोहित शर्मा केवळ 91 धावा करू शकला होता. या पराभवासह भारताचा घरच्या मैदानावर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रथमच क्लिन स्वीप झाला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी कोहली आणि रोहितला जुन्या गोष्टी डोक्यातून काढून टाकून नवी सुरुवात करायला हवी, असं ब्रेट ली म्हणाला.
ब्रेट ली आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला, “सगळीकडे चर्चा होती की भारत मालिका 3-0 ने जिंकेल. मी देखील हिच भविष्यवाणी केली होती. मात्र तसं झालं नाही. भारताच्या फलंदाजीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी मालिकेत 37 विकेट घेतल्या. मला वाटत आहे की, भारतीय संघ थोडा जास्त आक्रमक होण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय फलंदाज असे शॉट खेळत होते, जे सामान्य क्रिकेट शैलीशी अनुसरून नाही.”
ब्रेट ली पुढे म्हणाला, जर आपण रोहित आणि कोहलीकडे पाहिलं तर त्यांनी मालिकेत 90-90 धावा केल्या. या त्यांच्या पातळीच्या खेळाडूच्या धावा नाहीत. ते यापेक्षा खूप चांगले खेळाडू आहेत. तुम्ही पाहिलं असेल की रोहित शर्मा वेगवान गोलंदाजाविरुद्ध कशाप्रकारे बाद झाला. मी हे नाही म्हणू शकत की त्याच्या तंत्रात काही चुका आहेत, कारण मी त्याला गेल्या दशकभरापासून खेळताना पाहिलं आहे. मला अजूनही वाटतं की तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मात्र तो थोडा जास्त आक्रमक आहे.”
ब्रेट लीला विश्वास आहे की विराट आणि रोहित जोरदार कमबॅक करतील. तो म्हणाला, “विराट आणि रोहित सारख्या खेळाडूंना पुन्हा आपल्या रणनीतीवर काम करावं लागेल. त्यांनी जेवढं झालं तेवढं क्रिकेटपासून दूर राहावं आणि ऑस्ट्रेलियात गेल्यावर पूर्ण ताकदीनीशी खेळावं. मी तुम्हाला खात्री देतो की, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रोहित शर्माला नव्या चेंडूनं त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आशा आहे की रोहित यासाठी तयार असेल.”
हेही वाचा –
रोहित, विराट की धोनी, आयपीएल 2025 साठी तुमचा जोडीदार कोण? केएल राहुलचे मजेशीर उत्तर
“मला 100 टक्के खात्री भारत ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल”, माजी क्रिकेटपटूचा विश्वास
अभिषेक शर्माला डिच्चू, आवेश खानचा पत्ता कट; तिसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11