क्रिकेटजगतात झेल सुटणे हे संघासाठी खूप महागात पडते. एका झेलने संपूर्ण सामना पलटू शकतो. अनेकवेळा तर एका झेलमुळे सामना अपेक्षेपेक्षाही खूप महागात पडू शकतो. परंतु तुम्हाला त्या झेलाबद्दल माहित आहे का? जो जगातील सर्वात महाग झेल ठरला होता.
या लेखात आपण त्याच सामन्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये एक झेल सुटल्यामुळे संघाने तब्बल ८१० धावा केल्या होत्या. त्यावेळी तो झेल सुटून जीवदान मिळालेल्या फलंदाजाने वैयक्तिक नाबाद ५०१ धावांची तूफान खेळी केली होती. हा एक विश्वविक्रम आहे.
जून १९९४मध्ये एजबॅस्टन येथे काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशीपमध्ये (County Cricket Championship) वॉर्विकशायरकडून (Warwickshire) खेळताना वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) डरहमविरुद्ध ५०१ धावांची तूफान खेळी केली होती.
त्यावेळी चमकदार कामगिरी करणारा फलंदाज लारा त्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिल्या चेंडूवर तो थोडक्यात बचावला होता. त्यानंतर जेव्हा लारा १८ धावांवर होता, तेव्हा सायमन ब्राऊनच्या (Simon Brown) चेंडूवकर यष्टीरक्षक ख्रिस स्कॉर्टने लाराचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी लाराला जीवदान मिळाले आणि त्याने तब्बल ४८३ धावा केल्या होत्या. हाच झेल जागतिक क्रिकेटमधील सर्वात महागडा झेल समजला जातो.
लाराचा झेल सुटल्यानंतर पुढे त्याने दमदार फटकेबाजी करत शतक जडले. त्यानंतर लाराने बघता बघता २००, ३००, ४०० आणि ५०० धावा पूर्ण केल्या. लाराच्या वॉर्विकशायर संघाने ४ बाद ८०१ धावांवर आपला डाव घोषित केला होता. लाराने अवघ्या ४२७ चेंडूंमध्ये ५०१ धावा केल्या होत्या. यामध्ये १० षटकार आणि ६२ चौकारांचा समावेश आहे. लाराच्या ऐतिहासिक खेळीमध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा ११७.३३ इतका होता. तत्पूर्वी डरहम संघाने त्यांचा पहिला डाव ८ बाद ५५६ धावांवर घोषित केला होता.
लाराने आपल्या धडाकेबाज खेळीने एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा हनीफ मोहम्मद (Hanif Mohammad) यांचा ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम तोडला होता. हनीफ यांनी १९५९मध्ये कराची येथे ४९९ धावा केल्या होत्या. तरी त्यांना ५०० धावांचा आकडा पार करता आले नाही. ते धावबाद झाले होते.
लारा आणि हनीफ मोहम्मदव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अव्वल खेळींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांचे नाव येते. ब्रॅडमन यांनी १९३०मध्ये न्यू साऊथ वेल्स संंघाकडून खेळताना क्वीन्सलँडविरुद्ध नाबाद ४५२ धावा केल्या होत्या. तर चौथ्या क्रमांकावर बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांचे नाव येते. १९४८ मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना काठियावाडविरुद्ध ४४३ धावांची खेळी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडे क्रिकेटमधील ५ सुपर हिरो, जे टी२०मध्ये ठरले झिरो
-क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..
-जेव्हा राहुल द्रविडच्या घरात शिरली होती अनोळखी मुलगी, घराच्या बाहेर जायला दिला होता नकार