-Sharad Bodage
वेस्ट इंडीज म्हणजे क्रिकेट इतिहासातील एक असा संघ जो कधीकाळी या खेळावर राज्य करायचा. कोणी त्यांच्या आसपासही नव्हतं. पण १९९६ नंतर एक असा काळ आला, तेव्हापासून वेस्ट इंडीज क्रिकेटचीच दुर्दशाच सुरू झाली. पुढे २०१० नंतर टी२० ने ते गतवैभव प्राप्त करून दिले. पण या सर्वाच्यामध्ये एक काळ असा गेला, ज्यामध्ये खरंतर एकच खेळाडू वेस्टइंडीज क्रिकेटची ओळख होता. तो ब्रायन लारा होता. आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी ४०० धावांची खेळी खेळणारा लारा. त्याच खास खेळीच्या आठवणीला उजाळा देऊया..
लाराने टेस्टच्या एका इनिंगमध्ये ४०० धावा केल्या आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे हे तर कोणीही सहज सांगेल. पण ती इनिंग खेळली कशी गेली आणि ती इनिंग सुरू असताना घटनाक्रम कसा घडत गेला, याचीच माहिती देणारा हा लेख. २००४ ला इंग्लंड वेस्ट इंडीज टूरवर गेलेली. कार्यक्रम भरगच्च होता. चार टेस्ट आणि सात वनडे. टेस्ट सीरीजला नाव देण्यात आलं विस्डेन ट्रॉफी. खरंतर त्यावेळी टेस्टमध्ये या दोन्ही टीमची बरोबरी होऊ शकत नव्हती. इंग्लंडची टीम सेटल होती तर वेस्ट इंडीज संक्रमणाच्या काळातून चाललेली. अपेक्षेप्रमाणेच इंग्लंडने यजमानांवर वर्चस्व गाजवले आणि टेस्ट सिरीजमध्ये ३-० अशी लीड घेतली.
लास्ट टेस्ट ऍटिग्वाच्या सेंट जोन्स रिक्रिएशन स्टेडियममध्ये. खरंतर ही मॅच नव्हती, वेस्ट इंडिजला आपली लाज राखायची होती. त्यातही टार्गेटवर होता कॅप्टन ब्रायन लारा. पहिल्या तीन टेस्टमध्ये फक्त शंभर रन्स. लाराच्या नावाला या रन्स शोभत नव्हत्या. तस पाहायला गेले तर लारा त्रिनिदादचा. पण कोणास ठाऊक त्याला ऍटिग्वाच ग्राउंड भलतच आवडायचं. १९९४ ला याच ग्राउंडवर याच इंग्लंडविरुद्ध त्याने ३७५ रनांची वर्ल्ड रेकॉर्ड इनिंग खेळलेली. पुढे ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने २००३ ला ३८० रन्स करत लाराचा रेकॉर्ड इतिहास जमा केलेला. हेडनच्या इनिंगनंतर लारा एका इंटरव्यूमध्ये म्हणालेला, “हेडनच अभिनंदन, पण हा त्याचा रेकॉर्ड अवघ्या काही दिवसात मीच मोडणार”.
असो, आपण चौथ्या टेस्टकडे जाऊ. टॉस जिंकून लाराने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर डॅरेन गंगा लवकरच आऊट झाला आणि ग्राउंडमध्ये आला ब्रायन लारा. ज्यावेळी तो ड्रेसिंग रूममधून ग्राउंडकडे येत असेल तेव्हा त्याला कल्पनाही नसेल की, आज मी काहीतरी ऐतिहासिक करण्यासाठी खाली उतरतोय. पहिल्या तीन मॅचला फ्लॉप झालेला लारा आज टचमध्येच दिसत होता. बॉल बॅटच्या मधोमध लागत होते. लंचनंतर पाऊस आल्याने थोडा खेळ वाया गेला. दिवस संपला तेव्हा आपल्या शतकाकडे चाललेला. दुसऱ्या दिवशी लवकरच त्याने रनांचा दुष्काळ संपवत आपल्या आवडत्या ग्राउंडवर सेंच्युरी ठोकली.
रामनरेश सरवानच्या साथीने तो इनिंग पुढे घेऊन चाललेला. दुसर्या सेशनमध्ये डबल सेंचुरी आणि दिवसाचा खेळ संपता-संपता ट्रिपल सेंचुरी त्याच्या बॅटमधून आली. सरवाननंतर रिकार्डो पॉवेल आणि हिंडृस थोड्याफार रन्स करून आऊट झाले. २०० ओव्हर्स बॉलिंग केलेल्या इंग्लंडच्या गोर्यापान बॉलर्सचे चेहरे लाल झाले होते. ते फक्त शरीराने मैदानावर उपस्थित होते. बॅटर्स खेळतायेत म्हणून त्यांना बॉलिंग करावी लागत होती. विकेट घ्यायची त्यांची कुठेच मानसिकता दिसली नाही.
लाराने ३५० चा टप्पा पार केला आणि ग्राउंडवर कल्ला व्हायला सुरुवात झाली. कारण, वेस्ट इंडीजच्या फॅन्सना ‘इंडिव्हिज्युअल हायेस्ट टेस्ट इनिंग’ खेळणारा बॅटर म्हणून लाराला पाहायचे होते. ३८० वर असताना गॅरेथ बॅटीला फोर मारत त्याने पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्या क्षणी खेळ काही वेळासाठी थांबवला गेला. कारण काही चाहते डायरेक्ट मैदानात घुसले. वाहवा, कौतुक झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला आणि थोड्याच वेळात त्यापेक्षाही मोठा सुवर्णक्षण लारा आणि वेस्ट इंडीज क्रिकेटच्या वाट्याला आला. बॅटीला नजाकती पॅडल स्वीप मारत त्याने ४०० वी रन काढली आणि इतिहास रचला. हेडनचा वर्ल्ड रेकॉर्ड लाराने सहा महिने देखील त्याने टिकू दिला नाही. आधीच ‘मी पुन्हा येईन’ म्हणल्याप्रमाणे लारा खरंच आला होता.
तिथेच वेस्ट इंडीजनं आपली इनिंग डिक्लेर केली. वेस्टइंडीज ५ आऊट ७५१ आणि एकटा ब्रायन चार्ल्स लारा नॉट आउट ४००. पुढे मॅच तर ड्रॉ राहिली. पण १२ एप्रिल २००४ ही तारीख क्रिकेट इतिहासात लिहिली गेली, तीही सुवर्णाक्षरांनी. फक्त ब्रायन लारा या नावासाठी.
डॉन ब्रॅडमन यांना खेळताना पाहिलेली लोक ‘एकमेवाद्वितीय’ होते, असं म्हणायची. मात्र, त्याच ब्रॅडमन यांनी सचिन तेंडुलकर माझ्यासारखा खेळतो असं म्हटलं. याच्याच पुढे जाऊन अनेक जण सचिन बेस्ट कि लारा बेस्ट? यावर वादविवाद करतात तेव्हा, लारा किती मोठा होता याचे उत्तर आपसूकच मिळते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा
रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…






