इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मँनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 299 धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतके केली. तर दुसरीकडे इंग्लंडसाठी ख्रिस वोक्स याने भेदक गोलंदाजीच्या जोरावर सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील ऍशेस 2023 मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलिया, तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. अशात चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने दिवसातील पहिली विकेट गमावली. ख्वाजा पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 15 असताना तंबूत परतला. त्याने वैयक्तिक 3 धावा करून खेळपट्टी सोडली. दुसरा सलामीवीर डेविड वॉर्नर वैयक्तिक 32 धावांवर बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने 115 चेंडूत 51 धावांची खेळी केली. स्टीव स्मिथ याने 41, तर ट्रेविस हेड याने 48 धावांवर विकेट गमावली. अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने 60 चेंडूत 51 धावा करून विकेट गमावली. कॅमरून ग्रीन 16, तर यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे 20 धावांवर बाद झाले. मिचेल स्टार्क 23* आणि पॅट कमिन्स 1* धावेसह खेळपट्टीवर कायम आहेत. जोश हेजलवूड अद्याप खेळण्यासाठी आला नाहीये. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स (Chris Woakes) याने 19 षटकात 52 धावा खर्च केल्या आहेत आणि आतापर्यंत 4 विकेट्स घेतल्या आहेत. दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड याने 14 षटकात 68 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या आहेत. मार्क वुड आणि मोईन अली यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ब्रॉड 600 विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी मुथय्या मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708), जेम्स अँडरसन (688*) आणि अनिल कुंबळे (619) यांचा समावेश आहे. ब्रॉड आता या यादीत नव्याने सामील झाला आहे. (Broad created history on the first day of the Manchester Test, Australia lost 8 wickets at the end of the day)
महत्वाच्या बातम्या –
युवा भारतीय संघाकडून पाकिस्तान चारी मुंड्या चीत! हंगरगेकर-साई सुदर्शन ठरले हिरो
पाकिस्तानविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा राजवर्धन हंगरगेकर ठरला पहिला भारतीय, युवा खेळाडूची मोठी कामगिरी