भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरू होईल. चार कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशा स्थितीत उभी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचे महत्व वाढले आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन यापैकी कोणाला खेळवणार, याविषयी स्वतः ब्रॉडने माहिती दिली आहे.
बरोबरीत उभी आहे मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथे झाले. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने सर्वांना आश्चर्यचकित करत २२७ धावांनी विजय मिळवला. मात्र, दुसऱ्या सामन्यात यजमान भारताने या पराभवाचे उट्टे काढत ३१७ धावांनी इंग्लंडला पराभूत केले. आता, मालिकेतील उर्वरित दोन सामने जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळविले जातील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला एक विजय व एक अनिर्णीत असा निकाल हवा आहे. तर, इंग्लंडला दोन्ही सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने कमालीचे अटीतटीची होतील यात शंका नाही.
ब्रॉडने सांगितली तिसऱ्या सामन्याची रणनीती
अहमदाबाद येथे होणारी तिसरी कसोटी दिवस-रात्र स्वरूपाची असेल. या सामन्यासाठी इंग्लंड संघ जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यापैकी कोणाला संधी देणारा? या प्रश्नाचे उत्तर स्वतः ब्रॉडने पुढे येत दिले आहे. तो म्हणाला, “मी आणि जिमी एकत्र खेळणार का याविषयी भरपूर चर्चा केली जात आहे. मात्र, सामन्याच्या दिवशी सकाळी खेळपट्टीचे स्वरूप पाहून याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
इंग्लंडची सर्वात अनुभवी वेगवान दुकली असलेल्या ब्रॉड व अँडरसनच्या जोडीने एकत्रितरित्या १,१०० बळी मिळवले आहेत. मात्र, इंग्लंड संघाने वेगवान गोलंदाजांसाठी रोटेशन पॉलिसीचा अवलंब केल्याने दोघांनी मागील दोन वर्षात एकसाथ फक्त नऊ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: दिवस-रात्र कसोटीसाठी असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी
ब्रेकिंग! शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी