मुंबई: इंग्लंडचे फुटबॉल प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्यात आत्मविश्वासाची कधीच उणीव नसते. त्यांनी इंग्लंडमधील दोन प्रमुख क्लबना लक्षणीय कालावधीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीला हरपलेला फॉर्म गवसला आहे.
ब्राऊन यांनी हल सिटीला चार वर्षे, तर स्विंडन टाऊनला पाच वर्षे मार्गदर्शन केले. भारतात पुणे सिटीचे प्रशिक्षक म्हणून त्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांना कौशल्य सिद्ध करण्यासाठी केवळ सहा सामन्यांचा कालावधी मिळाला.
वास्तविक एकूण परिस्थिती पाहता पुणे सिटीने त्यांना पुढील मोसमाच्यादृष्टिनेच करारबद्ध केल्याचे स्पष्ट आहे. मागील मोसमात उपांत्य फेरी गाठलेल्या पुणे सिटीसाठी यंदा मोहिमेची सुरवात खराब झाली. प्रद्युम्न रेड्डी यांनी आशा थोड्या पल्लवित केल्या तरी हा संघ पिछाडीवरच पडला होता.
कुणीही कितीही प्रयत्न केले तरी पुणे सिटी पहिल्या चार क्रमांकांमध्ये स्थान मिळवून बाद फेरी गाठण्याचा चमत्कार होणे अशक्य होते, मात्र सुत्रे स्विकारल्यापासून तीन सामन्यांत ब्राऊन यांनी पुणे सिटीला कोणती उणीव भासत होती हे दाखवून दिले.
ब्राऊन सुरवातीला म्हणाले होते की, पुणे सिटीमध्ये दिर्घ करार मिळण्यास आणि आयएसएलमधील साहसी वाटचाल कायम राखण्यास खेळाडूंनी मला मदत करायला हवी. मी केवळ सहा सामन्यांसाठीच आलो असे म्हणणे नकारात्मक दृष्टिकोन ठरेल. येथे याहून जास्त काहीतरी साध्य करण्याची क्षमता माझ्याकडे असल्याचा विश्वास आहे.
ब्राऊन यांनी आतापर्यंत जे काही साध्य केले आहे ते अप्रतिम आहे. चेन्नईयीन एफसीवर पुणे सिटीला पहिलावहिला विजय मिळवून देत त्यांनी मोहिमेची सुरवात धडाक्यात केली. या प्रभावी विजयानंतर त्यांनी एटीकेविरुद्ध पुणे सिटीला पिछाडीवरून बरोबरी साधून दिली. रॉबिन सिंगने अंतिम टप्यात गोल करीत संघासाठी एक गुण खेचून आणला. या दोन निकालांनंतर संघाचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला. या पार्श्वभूमीवर पहिल्या चार संघांमधील प्रतिस्पर्धी जमशेदपूर एफसीवरील 4-1 असा विजय अनपेक्षित ठरला नाही. याबद्दल ब्राऊन आणि त्यांच्या व्यवस्थापनाला श्रेय द्यावे लागेल.
जमशेदपूरला त्यांच्याच मैदानावर पुणे सिटीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने हतप्रभ केले ते अत्यंत प्रभावी होते. कार्लोस कॅल्वोने 75व्या मिनिटाला पेनल्टीवर केलेला गोल हाच जमशेदपूरसाठी एकमेव दिलासा ठरला. सेझार फरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला घरच्या मैदानावर मोसमात प्रथमच पराभूत व्हावे लागले. यावरून पुणे सिटीचा विजय हा किती मोठा पराक्रम होता हे स्पष्ट होते.
ब्राऊन म्हणाले की, एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही एका क्लबमध्ये जाता तेव्हा तेथील समस्येची जबाबदारी तुम्हाला स्विकारावी लागते. मला फार मोठ्या समस्येचा सामना करावा लागला असे वाटत नाही. दोन सामने जिंकलेल्या संघाची सुत्रे मी स्विकारली. तुम्ही असा संघ स्विकारता तेव्हा तुम्हाला लिग समजून घ्यावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे मला खेळाडूंच्या या समुहाकडून तयारी करून घेण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी मिळाला होता. प्रशिक्षक म्हणून हाच माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण होता.
पुणे सिटीचा आताचा दृष्टिकोन प्रामुख्याने मोसमाच्या प्रारंभाच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे. तेव्हा मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्याकडे सुत्रे होती. पुणे सिटी संघ आता इतर कोणत्याही संघाइतकाच चांगला असल्याचे दिसून येते. ब्राऊन यांच्या या प्रभावानंतरही बाद फेरीच्यादृष्टिने पुणे सिटीसाठी फार उशीर झाला आहे.
पुणे सिटीने 15 सामन्यांतून 18 गुण मिळविले आहेत. ते कमाल 27 गुणांपर्यंत मजल मारू शकतात. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्याइतकेच हे गुण आहेत. हे दोन संघ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांनी एक गुण मिळविला तरी पुणे सिटीची संधी संपुष्टात आलेली असेल. याशिवाय जमशेदपूर आणि एटीके हे दोन संघ पुणे सिटीच्या पुढे आहेतच.
यानंतरही ब्राऊन आपल्या संघाला धडाका कमी करू देणार नाहीत. हे खेळाडू पुन्हा फुटबॉलचा आनंद लुटू लागले आहेत. अशावेळी ब्राऊन मोसमाच्या प्रारंभापासून असले असते तर काय कमाल झाली असते असे प्रत्येकाला वाटू लागले आहे.