जेव्हा कोणीही आयपीएल स्पर्धेच्या ग्लॅमरचे स्वप्नही नव्हते पाहिले, त्यावेळी भारतात उन्हाळ्यात खेळल्या जाणाऱ्या शीश महल क्रिकेट स्पर्धेने देशातील काही दिग्गज क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली होती. ज्यामध्ये भारतीय संघाचा विश्वविजेता माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे.
लखनऊ मध्ये होणारी वार्षिक शीश महल स्पर्धा ५९ वर्षांनंतर अर्थात २०१० मध्ये संपली. त्यानंतर आयपीएल द्वारे जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंना चिक्कार पैसा आणि उच्च श्रेणीच्या स्पर्धेचा फायदा उठवता आला.
परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंपैकी अनेक खेळाडू शीश महल स्पर्धेचे आभारी आहेत. ३९ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज धोनीने १८ वर्षांच्या वयात पहिल्यांदा शीश महल स्पर्धेत पाऊल ठेवले होते. त्याने पहिल्याच सामन्यात सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड संघाकडून खेळताना अर्धशतक ठोकले होते.
जेव्हा शीश महल स्पर्धा अव्वल स्थानी होती, त्यावेळी भारतीय संघाचे त्या त्या काळातील दिग्गज कर्णधार, मन्सूर अली खान पतौडी, कपिल देव आणि बिशन सिंग बेदीदेखील या स्पर्धेचा भाग होते.
या स्पर्धेची सुरुवात १९५१ साली लखनऊमध्ये अस्कारी हसन यांनी केली होती. क्रिकेटची आवड असणाऱ्या कुटुंबातील हसन आपल्या काळातील उत्कृष्ट अष्टपैलू होते. त्यांनी २ आणि ३ दिवसीय सामन्यांची सुरुवात केली होती. परंतु लवकरच ही स्पर्धा ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारात बदलली. त्यानंतर १० वर्षांनंतर शीश महल स्पर्धेने ट्वेंटी-२० क्रिकेटचे रूप घेतले होते.
अनेक खेळाडू यूएईतून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येत होते. त्यांचा उद्देश्य या ट्रॉफीसह बक्षीस रक्कम मिळविणेही होता. तरीही या स्पर्धेने अनेक युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. परंतु खेळाडूंना या स्पर्धेत आणण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे पैसा.
एएफपीशी चर्चा करताना २८ वर्षांपर्यंत शीश महल स्पर्धा खेळणारे उत्तर प्रदेशचे खेळाडू अशोक बांबीने म्हटले, “त्यावेळी कसोटी खेळाडूंनाही पैसे मिळत नव्हते. क्लब आपल्या स्टार खेळाडूंच्या प्रवासाचा आणि हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च करायचे. गोष्ट फक्त क्रिकेट खेळण्याची होती. तो वेगळाच काळ होता.”