---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी असे असू शकतात टीम इंडियाचे ११ शिलेदार

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 7:53 PM
---Advertisement---

उद्या (29 फेब्रुवारी) ख्राईस्टचर्च (Christchurch) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना (2nd Test Match) सुरु होणार आहे.

या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला या कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

या सामन्यासाठी भारताच्या संघाकडून मयंक अगरवाल बरोबर पृथ्वी शॉलाच सलामीला खेळण्यासाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तो नुकताच पायाच्या दुखापतीतून सावरला असून तो हा सामना खेळण्यासाठी तयार असल्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.

तसेच मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळू शकतात. त्यांना मधल्या फळीची जबाबदारी सांभाळावी लागेल.

त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून या सामन्यासाठी रविंद्र जडेजाला संधी दिली जाऊ शकते. याचे संकेतही शास्त्री यांनी दिले आहेत. तसेच जडेजा फिरकी गोलंदाजी बरोबरच फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे आर अश्विनला फलंदाजीत आलेल्या अपयशामुळे त्याच्याऐवजी जडेजाला संधी मिळू शकते. त्याचबरोबर जडेजाच्या जोडीला हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते.

तसेच भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या फळीत महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या घोट्याच्या दुखापतीने डोके वर काढल्याने तो या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास उमेश यादवला संधी मिळू शकते. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे नियमित वेगवान गोलंदाज भारतीय संघाचा भाग असतील.

यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतच कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे 4.00 वाजता सुरु होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), उमेश यादव, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---