चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२१ हंगामातील नववा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्सने १३ धावांनी खिशात घालत सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. आपल्या अप्रतिम गोलंदाजीने मुंबईच्या विजयात योगदान देणाऱ्या जसप्रीत बुमराहचे माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने कौतुक केले आहे.
या शब्दात केले कौतुक
मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर व समालोचक सेहवागने एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना म्हटले, “बुमराह हा मुंबई इंडियन्सचा ब्रह्मास्त्र आहे. जोपर्यंत हे ब्रह्मास्त्र मुंबईकडे आहे तोपर्यंत मुंबई अजय राहील.”
मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या बुमराहने या सामन्यात ४ षटके टाकताना अवघ्या १४ धावा देऊन १ बळी आपल्या नावे केला होता.
मुंबईचा दुसरा विजय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ गडी गमावून १५० अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती. मुंबईसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० धावा बनविल्या होत्या. तर, रोहित शर्माने ३२ व कायरन पोलार्डने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले होते. हैदराबादसाठी विजय शंकर व मुजीब उर रहमानने प्रत्येकी दोन बळी मिळवले होते.
प्रत्युत्तरात, स्पर्धेत प्रथमच सलामीला उतरलेल्या जॉनी बेअरस्टोने हैदराबादला वेगवान सुरुवात करुन दिली होती. त्याने २२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४३ धावा फटकावल्या होत्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नर ३५ धावा काढून दुर्देवरित्या धावबाद झाला होता. मधल्या फळीतील युवा फलंदाजांना हा दबाव पेलवला नाही आणि हैदराबादला स्पर्धेतील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBvsKKR Live: नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या पारड्यात, ‘या’ खेळाडूंना मिळाली अंतिम ११ मध्ये जागा
RCBvKKR: कोहलीला ‘हा’ किर्तीमान करण्याची संधी, बनू शकतो आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज
‘एवढ्या युवा खेळाडूंना घेऊन खेळल्यानंतर पराभव होणारचं होता,’ दिग्गजाचा कर्णधार वॉर्नरवर निशाणा