भारताच्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसर्या सराव सामन्याला ११ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. गुलाबी चेंडूवर प्रकाशझोतात खेळविण्यात येणार्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाचा डाव ९ बाद १२३ असा गडगडला होता. मात्र त्यानंतर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तुफानी अर्धशतक लगावत सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याच्या या अर्धशतकामुळे भारतीय संघ १९४ धावांपर्यंत पोहोचू शकला. सामना संपल्यानंतर बुमराह देखील आपल्या या कामगिरीवर खुश झाल्याचे दिसून आले. त्याने ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला.
ट्विटला दिली खास कॅप्शन
जसप्रीत बुमराह हा आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या उडवण्यासाठी प्रसिद्ध असला तरी त्याची फलंदाजी आजवर यथातथाच असायची. दुहेरी धावसंख्या गाठणे देखील मोठ्या मुश्किलीने त्याला साध्य व्हायचे. मात्र बुमराहने फलंदाजी सुधारण्याचे मनावर घेतल्याचे सराव सामन्यात दिसून आले. बुमराहने ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्याने मोहम्मद सिराजसह दहाव्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी रचली.
याच खेळी दरम्यानचा एक फोटो बुमराहने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. या फोटोला त्याने ‘रोज एक नवीन गोष्ट करून बघावी, असं म्हणतात’, अशी गमतीशीर कॅप्शन देत त्यासह हसण्याचा इमोजी देखील पोस्ट केला आहे. हे ट्विट अनेक लोकांनी लाइक आणि रिट्विट सुद्धा केले आहे.
Try one new thing per day, they said.😂 pic.twitter.com/Yozpazpoak
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) December 11, 2020
भारताला ८६ धावांची आघाडी
दुसर्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाला जसप्रीत बुमराहने तारून नेले. फलंदाजी करत असताना एकवेळ भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा देखील पार करतो की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र बुमराहने मोहम्मद सिराजच्या साथीने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी नांगी टाकायला भाग पाडले. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १०८ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद शमी आणि नवदीप सैनीने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर बुमराहने देखील २ बळी घेत त्यांना सुयोग्य साथ दिली.
संबंधित बातम्या:
– जसप्रीत बुमराहची फलंदाजीतही कमाल; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात झळकाविले तुफानी अर्धशतक
– IND Vs AUS A : सराव सामन्याचा पहिला दिवस बुमराहच्या नावावर, भारताला मिळाली ८६ धावांची आघाडी
– INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था दयनीय