भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार असल्याचे जवळजवळ पक्के झाले आहे. त्याने आज उमेदवारी अर्ज भरला आहे. बीसीसीआयच्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारिख होती.
यामध्ये अध्यपदासाठी केवळ गांगुलीने अर्ज भरला आहे. रविवारी मुंबईमध्ये बीसीसीआयच्या सर्व सदस्यांची अनौपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत गांगुलीच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली होती. त्यामुळे गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
गांगुलीने बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हटले आहे की ‘आशा आहे की पुढील काही महिन्यात आपण सर्वकाही सुरळीत करु आणि भारतीय क्रिकेटमध्ये सामन्यपणा परत आणू.’
‘या पदासाठी मी कधीही माझी आकांक्षा व्यक्त केली नव्हती. मी कोणाशीही बोललो नव्हतो. मला काल रात्री 10.30 पर्यंत(रविवारी, 13 ऑक्टोबर) याबद्दल काही माहित नव्हते. त्यानंतर मला कळवण्यात आले की मी बीसीसीआयचा अध्यक्ष बनत आहे.’
तसेच गांगुली म्हणाला, ‘मला जेव्हा 2000 मध्ये कर्णधारपद मिळाले होते, तेव्हाही परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे कठिण परिस्थितीत काहीतरी चांगले करण्याची ही चांगली संधी आहे.’
त्याचबरोबर गांगुली म्हणाला, ‘मागील 3 वर्षापासून बीसीसीआयमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. यावर सर्व सदस्य मात करु शकतात.’
2000 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरण गाजले होते.
तसेच गांगुलीने प्रथम श्रेणीच्या क्रिकेटपटूंना अधिक प्राधान्य देणार असल्याचेही म्हटले आहे.
त्याचबरोबर गांगुली व्यतिरिक्त बीसीसीआचे सचिवपद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाहला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांचा लहान भाऊ अरुण धूमलकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.






