सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले बॉल टेम्परिंग प्रकरण चांगलेच गाजलेले. या प्रकरणी दोषी आढळलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बेनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात शिक्षा झालेल्या बेनक्रॉफ्टने जवळपास अडीच वर्षांनंतर याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
बेनक्रॉफ्टचा महत्त्वपूर्ण खुलासा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर काळा डाग मानल्या गेलेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणात सहभागी असलेला तिसरा खेळाडू कॅमेरून बेनक्रॉफ्ट याने याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला. ऑस्ट्रेलियातील एका मुख्य वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत झालेली ती घटना दुर्देवी होती. या प्रकरणी आम्ही तिघे दोषी ठरलो. मात्र, या प्रकरणाची कल्पना संघातील गोलंदाजांंना होती. मी जे केले त्याची जबाबदारी स्वत: घेतो. मी तेव्हा अधिक जागरूक असतो तर, ही घटना टाळता आली असती.”
आपले म्हणणे पुढे नेताना बेनक्रॉफ्ट म्हणाला, “मी खूप दु:खी झालो होतो. मी एक असे काम केले, ज्यामुळे खेळाच्या मूल्यांना तडा गेला. मी या आघाडीवर सुधारणा करू इच्छितो. मी अद्याप एकही शतक झळकावले नाही. मात्र, मी ते पूर्ण करु शकलो असतो.”
मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या बेनक्रॉफ्टने आतापर्यंत १० कसोटी सामने खेळताना ४४६ धावा बनविल्या आहेत.
काय होते बॉल टेम्परिंग प्रकरण
ऑस्ट्रेलिया संघ २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना केपटाऊन कसोटीत कॅमेरून बेनक्रॉफ्ट सॅंडपेपरने चेंडूचा आकार बदलताना आढळून आला. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर कर्णधार स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांचे प्रत्येकी १२ महिने तर बेनक्रॉफ्टवर ८ महिन्यांची बंदी घातली गेलेली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या उन्हाळी हंगामात केन विलियम्सन विराट कोहलीपेक्षा जास्त धावा करेल,’ पाहा कोणी केलंय हे विधान
“मी त्याला कधीच विसरू शकत नाही, कारण…”, टीम पेनचे कोहलीबाबत मोठे भाष्य
जिंदगी हो तो ऐसी! इमाम उल हकने भन्नाट मिम शेअर करत अविवाहित खेळाडूंची केली चेष्टा






