आयपीएलच्या 19 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) अवस्था बिकट झाली आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मैदानात उतरलेला हा संघ अद्याप आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसला असून, पंजाबविरुद्धच्या सामन्यातही संघाची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली. संघाने मिनी ऑक्शनमध्ये एका खेळाडूवर 25.20 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली होती, पण सध्या तरी हा खर्च व्यर्थ गेल्याचे दिसत आहे.
केकेआरने ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर कॅमरन ग्रीन (Camron Green) याच्यावर मोठा विश्वास दाखवत त्याला संघात घेतले होते, मात्र तो पूर्णपणे ‘फ्लॉप’ ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांत त्याला फलंदाजीने काहीही कमाल करता आली नाही. त्याने केवळ 24 धावा केल्या आहेत.
दुखापतीमुळे त्याने अद्याप एकाही सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला संघात स्थान मिळाले होते, पण गोलंदाजी करू शकत नसल्याने संघाचे समीकरण बिघडले आहे. इतकी मोठी रक्कम मोजूनही ग्रीनकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. जर त्याने लवकर लय पकडली नाही, तर केकेआरचा पुढचा प्रवास अधिक खडतर होऊ शकतो.





