दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल २०२६ च्या हंगामात सध्या चांगलाच जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामात आज (२५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळला जात आहे. यामध्ये राहुलने नाबाद शतकी खेळी करत एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्या विक्रमांना मागे टाकले आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे.
राहुलने पंजाब किंग्जविरुद्ध १३ वी धाव घेताच हा विक्रम केला. धोनीने आयपीलच्या २७८ सामन्यांमध्ये ३८.३० च्या सरासरी आणि १३७.४५ च्या स्ट्राईक रेटने ५४३९ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकाचा समावेश असून त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८४ राहिली आहे. रैनाने २०५ आयपीएल सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्या आहेत. पंजाबविरुद्ध ४७ चेंडूत शतक करताच राहुलने धोनी आणि रैनाला मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुलच्या पुढे आणखी चार फलंदाज आहेत. यातील तीन भारतीय असून एक विदेशी खेळाडू आहे. या यादीत पहिल्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली आहे. त्याने ८९८९ धावा केल्या असून नऊ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ ११ धावांची आवश्यकता आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. विराट आणि रोहितमध्ये जवळपास २००० धावांचा फरक आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये ७१८३ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या यादीत राहुलने क्रिस गेलची बरोबरी केली आहे. पीबीकेएस विरुद्ध केलेले शतक राहुलचे आयपीएलमधील सहावे शतक ठरले असून तेवढेच गेलने केले आहेत.
राहुल पीबीकेएसविरुद्ध ६७ चेंडूत १६ चौकार आणि ९ षटकार मारत १५२ धावा करत नाबाद राहिला आहे. त्याच्या या दीडशतकी खेळीमुळे डीसीने पीबीकेएसला २६५ धावसंख्येचे लक्ष्य दिले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके-
विराट कोहली – ८
जोस बटलर – ७
क्रिस गेल – ६
केएल राहुल – ६*
संजू सॅमसन – ५
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
१. विराट कोहली – ८९८९
२. रोहित शर्मा – ७१८३
३. शिखर धवन – ६७६९
४. डेविड वॉर्नर – ६५६५
५. केएल राहुल – ५५७९*
५. सुरेश रैना – ५५२८
६. एमएस धोनी – ५४३९
८. अजिंक्य रहाणे – ५१८४
९. एबी डिविलियर्स – ५१६२
१०. सूर्यकुमार यादव – ४४३२





