मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३८ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना पंजाब किंग्स संघाने ११ धावांनी जिंकला. हा पंजाबचा हंगामातील चौथा विजय होता, तर चेन्नईचा सहावा पराभव होता. त्यामुळे आता रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ससमोरील प्लेऑफसाठीचे मार्ग खडतर बनला आहे.
चेन्नईने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) ८ सामने खेळले आहेत. यातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नईने सामने जिंकले आहेत. मात्र, अन्य ६ सामन्यांत चेन्नईला पराभवाचा धक्का बसला आहे. आता चेन्नईला साखळी फेरीत आणखी ६ सामने खेळायचे आहेत. अशाच चेन्नईसमोरील मार्ग कठीण असला तरी प्लेऑफमध्ये जाण्याचे अजूनही मार्ग बंद झालेले नाही.
कसे आहे चेन्नई समोरील समीकरण
चेन्नईला (Chennai Super Kings) अद्याप ६ साखळी सामने खेळायचे आहेत, तसेच संघ सध्या गुणतालिकेत ४ गुणांसह ९ व्या क्रमांकावर आहे. तसेच चेन्नईचा – ०.५३८ नेट रनरेट आहे. त्यामुळे आता चेन्नईला जर प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) जायचे असेल, तर त्यांना उर्वरित सर्व ६ साखळी सामने जिंकावे लागतील, जेणेकरून संघाचे गुण १६ होऊ शकतील. इतकेच नाही तर चेन्नईला आपला नेट रनरेट देखील सुधारावा लागणार आहे.
जर चेन्नईने (CSK) उर्वरित ६ साखळी सामने जिंकले आणि नेट रनरेटही चांगला केला, तर त्यांच्यासाठी प्लेऑफ खेळण्याच्या आशा पल्लवित होऊ शकतात. कारण आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १६ गुण असणाऱ्या संघांनी बऱ्याचदा प्लेऑफ खेळला आहे. पण असे असले, तरी चेन्नईला हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
चेन्नईला उर्वरित ६ साखळी सामने सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांविरुद्ध खेळायचे आहेत.
अशी आहे गुणतालिका
सध्या आयपीएल २०२२ गुणतालिकेत (IPL Pointable) गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर हे चार संघ प्रत्येकी १० गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
तसेच पंजाब किंग्स ८ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स ४ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघ शून्य गुणांसह शेवटच्या स्थानावर आहेत. मुंबईचे प्लेऑफसाठीचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये ‘घोडेस्वारी’ सेलिब्रेशन कधी पाहिलेय का? पंजाबच्या वेगवान गोलंदाजाचा अनोखा अंदाज
‘त्याचीच कमी भासतेय’, चेन्नईच्या ६ व्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने सांगितली संघातील कमजोरी
शिखर धवनचे विक्रमी अर्धशतक! चेन्नईविरुद्ध ८८ धावा ठोकत विराट, रोहितच्या पंक्तीत स्थान