राहुल द्रविड यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यापासून तो मुख्य प्रशिक्षकपद सांभाळेल. परंतु राष्ट्रीय संघासाठी प्रशिक्षणाचा कोणताही अनुभव नसलेला गौतम गंभीर ही जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होईल का? हा मोठा प्रश्न आहे. एक खेळाडू किंवा कर्णधार म्हणून तुमचा आक्रमक स्वभाव तुम्हाला यशस्वी करू शकतो, पण जेव्हा भूमिका प्रशिक्षकाची असते, तेव्हा तुम्हाला शांत आणि अचूक निर्णय घ्यावे लागतात. आता भीती आहे की, मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची सर्वात मोठी ताकद त्याची सर्वात मोठी कमजोरी बनू शकते.
गंभीरनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे. तो एक यशस्वी क्रिकेटपटू राहिला आहे. त्याला खेळाची सखोल जाण आहे. कोणतीही टूर्नामेंट कशी जिंकायची हे गंभीरला माहीत आहे, कठीण प्रसंगांना तोंड देताना गंभीर अनेक वेळा यशस्वी झाला आहे. बाद फेरीतील दडपणाचा सामना कसा करायचा हे त्याला चांगलंच माहीत आहे.
खेळाडू म्हणून दोन विश्वचषक जिंकणाऱ्या गंभीरनं आयपीएलमध्ये एकूण तीन ट्रॉफी जिंकल्या. यापैकी दोनदा तो कर्णधार होता तर एकदा त्यानं मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. या सर्व गोष्टी पाहून बीसीसीआयनं त्याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. परंतु आपल्या मजबूत नेतृत्व क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेला गौतम गंभीर त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही थोडा कुप्रसिद्ध आहे. खेळाच्या मैदानावर अनेक वेळा त्याची इतर खेळाडूंशी वादावादी झाली आहे.
मात्र यात चुकीचं असं काहीच नाही. जेव्हा एखादा खेळाडू मैदानावर आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कधीकधी त्याचा आक्रमक स्वभाव जरा जास्तच दिसून येतो. पण, जेव्हा गोष्ट संघाच्या प्रशिक्षकपदाची असते, तेव्हा शांत वृत्ती स्वीकारावी लागते.
आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणून लखनऊ सोबत असो किंवा केकेआर सोबत, गंभीर नेहमीच त्याच्या आक्रमक शैलीत दिसला. आयपीएल लिलावात पूर्णपणे शांत दिसणारा गंभीर डगआउटमध्ये खूपच ॲनिमेटेड दिसायचा. तो प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक शॉटवर प्रतिक्रिया देतो. तुम्हाला आरसीबी आणि लखनऊमधील सामना आठवत असेल, जेव्हा गंभीरनं विराट कोहली आणि नवीन उल हकचा मुद्दा उपस्थित करून मैदानाच्या मध्यभागी गोंधळ घातला होता.
सध्याच्या संघात असे अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत, जे गंभीर सोबत क्रिकेट खेळले आहेत. अशा स्थितीत त्यांच्यासोबत ताळमेळ साधणं, हे गंभीरसाठी मोठं आव्हान असेल. त्याच बरोबर त्याला युवा खेळाडूंना देखील सोबत घेऊन चालावं लागेल. अशा स्थितीत भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरच्या स्वभावात बदल होतो, की तो पूर्वी प्रमाणेच आक्रमक शैलीत दिसतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुझी 22 वर्षांची कारकीर्द…”, जेम्स अँडरसनसाठी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
असा गोलंदाज पुन्हा होणे नाही! जेम्स अँडरसनचे क्रिकेटमधील असे रेकॉर्ड, जे कोणालाही मोडता येणे अशक्य
कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत! जेम्स अँडरसननं विजयासह घेतला निरोप