मागच्या वर्षी झालेला पुणे आणि पंजाबचा सामना सर्व चाहत्यांना चांगलाच लक्षात राहिला असणार. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर शेवटच्या ३ चेंडूंवर एक चौकार आणि २ षटकार मारून तेव्हाच्या पुण्याच्या कर्णधाराने म्हणजेच महेंद्र सिंग धोनीने सामना पुण्याला जिंकूवून देत त्या पर्वाचा सुखद शेवट केला.
आता एक वर्षानंतर पंजाबचा पहिला सामना पुन्हा पुण्यासोबतच आहे. यावर्षी विशेष म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार बदलले आहेत व ते दोघेही ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत . मॅक्सवेल हा पंजाबचा दहावा कर्णधार आहे तर स्मिथ हा पुण्याचा दुसराच कर्णधार आहे. स्मिथकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाचा अनुभव आहे तर मॅक्सवेल हा पहिल्यांदाच कोणत्याही संघाचे नेतृत्व करत आहे. या दोन संघात जरी पुण्याचं पारडं जड दिसत असलं तरी पंजाबकडे मॅक्सवेल, मिलर आणि मॉर्गन सारखे गेमचेंजर्स आहेत.
आता पर्यंतच्या लढतीत पंजाबने एकदा आणि पुण्यानेही एकदा विजय मिळवला आहे.