अफगाणिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत 9 दिवसातच दुसरा मोठा उलटफेर केला. सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम येथे पार पडलेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला 8 विकेट्सने नमवले. हा त्यांचा या विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. या विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी भलताच खुश झाला. त्याने सामन्यानंतर दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 282 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने 49 षटकात 2 विकेट्स गमावत 286 धावा केल्या. अशाप्रकारे हा सामना 8 विकेट्सने आपल्या खिशात घातला. यावेळी अफगाणिस्तानसाठी इब्राहिम जादरान याने सर्वाधिक 87 धावांची खेळी साकारली. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विशेष म्हणजे, अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्ध हा पहिला वनडे विजय आहे. या विजयानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू आणि चाहते खूप खुश दिसत आहेत. पाकिस्तानविरुद्ध जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी संपूर्ण मैदानाला चक्करही मारली. तसेच, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने विजयानंतर म्हटले की, त्यांनी पाकिस्तानविरुद्ध एका व्यावसायिक संघाप्रमाणे आव्हानाचा पाठलाग केला.
काय म्हणाला कर्णधार?
सामन्यानंतर शाहिदी म्हणाला, “या विजयाची चव चांगली आहे. आम्ही एका व्यावसायिक संघाप्रमाणे आव्हानाचा पाठलाग केला. पुढील सामन्यातवर आमचे लक्ष आहे. ज्याप्रकारे आम्ही आज पाठलाग केला, तसे आम्ही पुन्हा करू. आम्ही मागील काही वर्षांपासून गुणवत्तापूर्ण क्रिकेट खेळत आहोत. याचा विश्वास तेव्हाही होता, जेव्हा आम्ही आशिया चषक खेळत होतो.”
पुढे बोलताना शाहिदी म्हणाला, “स्पर्धेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की, आम्ही ही स्पर्धा आमच्या देशातील लोकांसाठी ऐतिहासिक बनवू इच्छितो. आधी इंग्लंड होते, आणि आज पाकिस्तान. इतर खेळांच्या प्रतीक्षेत आहे. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळणे आणि या विश्वचषकात आपल्या देशासाठी खूप काही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.”
संघातील खेळाडूंचे गुणगान गाताना तो म्हणाला, “फिरकी विभागाने चांगले प्रदर्शन केले. आम्ही नूरला संधी दिली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने त्याची प्रतिभा दाखवली. गुरबाज आणि इब्राहिम यांनी ज्याप्रकारे डावाची सुरुवात केली, त्यांनी ती गती आणि आत्मविश्वास दिला. खेळ सुरू होण्यापासून ते अखेरपर्यंत आमच्या हातात होता. मी शेवटी रहमतसोबत जी भागीदारी केली, तीही चांगली होती.”
कर्णधाराची विजयी खेळी
या सामन्यात अफगाणिस्तानला विजयासाठी जेव्हा 7 चेंडूत 1 धावेची गरज होती, तेव्हा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने 49व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जबरदस्त चौकार ठोकत सामना 8 विकेट्सने जिंकून दिला. शाहिदीने सामन्यात 45 चेंडूंचा सामना करताना 48 धावांचे योगदान दिले. यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. (captain hashmatullah shahidi big statement after afghanistan beat pakistan said the way we chased today read more)
हेही वाचा-
अफगाणिस्तानने पराभवाची धूळ चारताच भडकला Babar Azam, थेट ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार; म्हणाला, ‘फ्लॉप…’
अफगाणिस्तानने केले विजयाचे सीमोल्लंघन! पाकिस्तानच्या पदरी वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव