गतविजेत्या इंग्लंड संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 विकेट्सने फडशा पाडला. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या शिलेदारांनी जबरदस्त प्रदर्शन करत पहिला विजय मिळवला. मात्र, हा सामना गमावल्यामुळे कर्णधार जोस बटलर याचा पारा चढला. त्याने सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली.
बटलरचे विधान
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने सामन्यानंतर म्हटले की, स्पर्धा आताच सुरू झाली आहे आणि आमचा हा पहिलाच पराभव आहे. यासोबतच तो असेही म्हणाला की, न्यूझीलंड संघाची फलंदाजी समजण्यास खूपच कठीण आहे. बटलर म्हणाला, “आमच्यासाठी आजचा दिवस खूपच निराशाजनक राहिला. न्यूझीलंडने खूपच वाईट पद्धतीने हरवलं आणि दारुण पराभव स्वीकारावा लागला. मात्र, मोठ्या स्पर्धेतील हा एकच पराभव आहे. मला वाटते की, आमच्या संघातील अनेक खेळाडूंनी खूप क्रिकेट खेळले आहे. आम्ही आधीही संघांना अशाप्रकारे हरवले आहे आणि या आधीही आम्हाला असे निकाल मिळाले आहेत.”
“न्यूझीलंडने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते समजणे खूपच कठीण आहे. कारण आमचे ध्येय 330च्या आसपासचे होते. ही फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी होती आणि मला वाटते की, दुसऱ्या डावात ही आणखी चांगली झाली. त्यांना जी सुरुवात मिळाली, त्याने कुठल्याही प्रकारचा दबाव बनवणे कठीण आहे,” असेही पुढे बटलर म्हणाला.
संघाच्या प्रदर्शनावर निराश बटलर
बटलरने पुढे बोलताना म्हटले की, त्यांना आपल्या नियोजनानुसार जाता आले नाही. तो म्हणाला, “आम्ही आमच्या योजनेनुसार खेळलो नाहीत. त्यात काही विकेट्स अशा होत्या, ज्यात योग्य प्रकारे शॉट मारले गेले नाहीत. आम्ही हे सकारात्मकरीत्या घेऊ. आम्ही आमच्या पद्धतीने खेळत राहू. मला वाटते की, त्यांनी चांगले शॉट्स खेळले आणि त्याचा त्यांना फायदा मिळाला. कॉनवेसारख्या खेळाडूने कोणताही मोठा शॉट खेळला नाही. मात्र, त्याने वेगाने धावा केल्या. असेच काहीसे रचिन रवींद्रचेही आहे. दोघांनीही शानदार भागीदारी केली आणि आम्ही हारलो.”
रूटचे कौतुक
जोस बटलरने म्हटले की, त्याला वाटते की, जो रूट जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. तो म्हणाला, जो रूट कोणत्याही प्रकारात खेळू शकतो. कारण, तो धावा करणारा खेळाडू आहे. खरं तर, या सामन्यात जोस बटलर हा न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक ठोकणारा इंग्लंडचा एकमेव फलंदाज होता. त्याने 77 धावांची शानदार खेळी साकारली होती. आता पुढील सामन्यात इंग्लंड विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (captain jos buttler could not believe on new zealand approach in 1st match of world cup 2023)
हेही वाचा-
आख्ख्या जगाला भारताच्या पहिल्या सामन्याची प्रतीक्षा; कधी आणि कुठे होणार IND vs AUS मॅच? वाचा सर्वकाही
‘रचिन मला तुझा अभिमान…’, शतकवीरावर कर्णधार लॅथमने उधळली स्तुतीसुमने, वाचा पूर्ण प्रतिक्रिया