अहमदाबाद येथे बनलेलं जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडिअम होय. हे स्टेडिअम आता विश्वचषक 2023 या महाकुंभमेळ्यातील महामुकाबल्यासाठी सज्ज झालं आहे. शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ या सामन्यात आमने-सामने येणार आहेत. या सामन्याबद्दल सोशल मीडियापासून क्रिकेटप्रेमींपर्यंत उत्साह पाहायला मिळत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या तयारीविषयी भाष्य केले. यावेळी त्याने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 7-0 या अजिंक्य विक्रमाविषयीही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला रोहित?
विश्वचषक इतिहासात भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त विक्रम राहिला आहे. पाकिस्तान भारताला एकदाही पराभूत करू शकला नाहीये. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघ 7 वेळा विश्वचषकात आमने-सामने आले आहेत. या सर्व सामन्यात भारतीय संघाने विजय साकारला आहे. विश्वचषक 1992 पासून भारतीय संघ सातत्याने विजय मिळवत आला आहे. मात्र, 2007मध्ये दोन्ही संघांमध्ये विश्वचषकाचा सामना खेळला गेला नव्हता.
अशात या विक्रमाविषयी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हैराण करणारे विधान केले आहे. तो म्हणाला की, “मी त्या व्यक्तींपैकी नाहीये, जो अशाप्रकारच्या आकड्यांवर लक्ष देतो. आमचे लक्ष फक्त यावर आहे की, आम्ही कसे क्रिकेट खेळू शकतो.”
भारतीय 3 फिरकीपटूंबद्दल रोहितचे विधान
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आर अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा एकत्र मैदानात उतरले होते. त्याचा निकालही आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. तिन्ही फिरकीपटूंनी शानदार प्रदर्शन केले होते आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विन संघाबाहेर होता. त्यामुळे रोहितला पुन्हा तिन्ही फिरकीपटू मैदानात उतरवण्याविषयी प्रश्न करण्यात आला. यावर तो म्हणाला की, “मला माहिती नाही. कारण, मी अद्याप खेळपट्टी पाहिली नाहीये. कुठलेही संघ संयोजन मैदानावर उतरो, आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
कर्णधाराचे शतक
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी स्पर्धेतील पहिला सामना खराब ठरला होता. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने कमाल केली. त्याने झंझावाती शतक ठोकले होते. त्याने 84 चेंडूत 131 धावांची शतकी खेळी साकारली होती. या खेळीत 5 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. अशात चाहते आणि संघाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही रोहितकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (captain rohit sharma on 7-0 record vs pakistan says this know here)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध गिल खेळणार का? कॅप्टन रोहितने दिले ‘हे’ उत्तर
भारतीय खेळाडूंनी दिली रंजक प्रश्नांची उत्तरे, इशान किशनसह विराटही आघाडीवर