भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने रविवारी आपला संघ जाहीर केला आहे. 2009 चा विजेता असलेल्या पाकिस्तानचा संघ स्पर्धेतील आपले सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळणार आहे. संघ जाहीर करताना पाकिस्तानी कर्णधाराने मान्य केले की, पाकिस्तान सर्व सामने एकाच शहरात खेळणार असल्याने त्यांना त्याचा फायदा मिळेल, परंतु जिंकण्यासाठी त्यांना चांगली क्रिकेट खेळावी लागेल.
यावेळी पाकिस्तानी कर्णधाराने भारताचे उदाहरण दिले, ज्यांनी गेल्या वर्षी यूएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आपले सर्व सामने खेळले होते आणि विजेतेपद पटकावले होते. भारत, पाकिस्तान आणि आयसीसी यांच्यात एक करार झाला आहे. त्याअंतर्गत भारत किंवा पाकिस्तान, या दोन्ही देशांत होणाऱ्या आयसीसी स्पर्धांसाठी ते एकमेकांच्या देशाचा प्रवास करणार नाहीत आणि सामने एका ‘न्यूट्रल वेन्यू’वर (तटस्थ ठिकाणी) खेळवले जातील. अशा परिस्थितीत, पाकिस्तान टी20 विश्वचषकातील आपले सामने श्रीलंकेत खेळत आहे आणि जर ते उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचले, तर ते सामनेही श्रीलंकेतच होतील.
पाकिस्तान आर. प्रेमदासा स्टेडियम आणि सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये आपले सामने खेळणार आहे. टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाच्या घोषणेवेळी सलमान आगा म्हणाला की, संपूर्ण स्पर्धेत एकाच हॉटेलमध्ये राहणे ही एक जमेची बाजू आहे, परंतु भारताने 2025 ची चॅम्पियंस ट्रॉफी जिंकली कारण त्यांनी चांगली कामगिरी केली होती. पत्रकार परिषदेत सलमान आगा म्हणाला, “हे आमच्यासाठी फायदेशीर आहे, कारण इतर संघ वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहतील आणि वेगवेगळ्या मैदानांवर खेळतील. आम्ही देखील कोलंबोमध्ये वेगवेगळ्या मैदानांवर खेळू, पण एकाच हॉटेलमध्ये राहू. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही चांगली क्रिकेट न खेळताही जिंकू शकतो.”
सलमान पुढे म्हणाला, “भारताने तिथे चांगली कामगिरी केली, म्हणूनच ते जिंकले. आम्हालाही तशीच कामगिरी करावी लागेल, तरच आम्ही जिंकू शकू. पण हो, निश्चितपणे आम्हाला याचा फायदा मिळेल.”






