मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) बांगलादेश संघाला विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. वानखेडे स्टेडिअमवर आफ्रिकेने बांगलादेशला 149 धावांनी पराभूत केले. हा बांगलादेशचा स्पर्धेतील सलग चौथा पराभव ठरला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने असे काही विधान केले, ज्यामुळे स्पष्ट झाले की, त्याने आपला संघ विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे स्वीकारले आहे.
काय म्हणाला शाकिब?
दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 382 धावांचा डोंगर उभारला. त्यांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव 233 धावांवर 46.4 षटकात संपुष्टात आला. या पराभवानंतर कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने म्हटले की, “मला वाटते की, आम्ही 25 षटकापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आम्ही 3 विकेट्सही घेतल्या. मात्र, तिथून पुढे त्यांनी ताबडतोब अंदाजात फलंदाजी करण्यास सुरुवात केली. खासकरून क्विंटन डी कॉकने. त्याने खूपच शानदार फलंदाजी केली. त्यानंतर क्लासेनने आफ्रिकेच्या डावाचा शेवट चांगला केला. अशाप्रकारच्या मैदानावर अशीच फलंदाजी होते.”
तीन संघांना म्हटले विजयाचा दावेदार
शाकिब याने यादरम्यान विश्वचषकातील संघाचे प्रदर्शन आपल्या वरच्या फळीतील फलंदाजांशी जोडले. तो म्हणाला, “आमचे अव्वल चार फलंदाज जे धावा करू शकत नाहीये, त्यांना धावा कराव्या लागतील. त्याचवेळी स्पर्धेत आम्ही थोडे पुढे जाऊ शकतो. सध्या तरी भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिके विजेतेपदाचे दावेदार वाटत आहेत. मात्र, काहीही होऊ शकते. कारण, स्पर्धा अजून बरीच लांब जाणार आहे.”
‘उपांत्य सामन्यात पोहोचलो नाही, तर…’
शाकिब म्हणाला की, “खूप काही शिकायला आहे आणि खूप काही खेळायचे बाकी आहे. आम्हाला ही स्पर्धा चांगल्याप्रकारे संपवायची आहे. जर आम्ही उपांत्य सामन्यात पोहोचलो नाही, तर पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर राहायचे आहे. आम्ही अजूनही खूप काही करू शकतो. मला आशा आहे की, आम्ही मजबूतीने पुनरागमन करू.”
बांगलादेशचे सामन्यातील प्रदर्शन
दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाकडून फक्त एक फलंदाज चमकला. तो म्हणजे महमुदुल्लाह. त्याने 111 चेंडूत 111 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज 30 धावांचाही आकडा पार करू शकला नाही. कर्णधार शाकिब फक्त 1 धावेवर बाद झाला होता.
अशात बांगलादेशला आपला पुढील सामना 28 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात शाकिबची सेना विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (captain shakib al hasan on bangladesh world cup 2023 semifinal chance after sa vs ban match)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेची घौडदौड सुरूच! बांगलादेशचा 149 धावांनी दारूण पराभव, पॉईंट्स टेबलमध्येही नंबर 2
वर्ल्डकपमध्ये गोलंदाजांचा काळ बनलेत दक्षिण आफ्रिकेचे बॅटर! डेथ ओव्हर्समध्ये आणलीय धावांची त्सुनामी