वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा चौथा सामना खूपच रोमांचकरीत्या पार पडला. आपण अनेकदा क्रिकेट सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडताना पाहतो, पण दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात चक्क शतकांची बरसात झाली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 102 धावांनी विजय झाला. या विजयाचा शिल्पकार वेगवान शतक झळकावणारा एडेन मार्करम ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयानंतर कर्णधार टेम्बा बावुमा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दसून शनाका (Dasun Shanaka) याचा हा निर्णय दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाच्या विस्फोटक फलंदाजांनी सपशेल चुकीचा सिद्ध केला. दक्षिण आफ्रिकेने यावेळी निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी 428 धावसंख्या उभारली. यामध्ये क्विंटन डी कॉक (100), रासी व्हॅन डर ड्युसेन (108) आणि एडेन मार्करम (106) यांच्या शतकांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने कडवी झुंज दिली, पण त्यांची झुंज अपयशी पडली. 44.5 षटकात त्यांचा संपूर्ण डाव 326 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने 102 धावांनी खिशात घातला. या विजयानंतर टेम्बा बावुमा (Temba Bavuma) खूपच खुश झाला. त्याची प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे.
काय म्हणाला बावुमा?
दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषक 2023मधील अभियानाची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात संघाच्या सर्व खेळाडूंनी आपले सर्वोत्तम योगदान दिले. मग ते फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. खेळाडू सर्व विभागात चमकले.
या सामन्यात मिळालेल्या शानदार विजयानंतर बावुमा म्हणाला, “आम्हाला विजय मिळवायचा होता आणि त्यात आम्ही यशस्वीही झालो. फलंदाजीत कोणतीही कमतरता नव्हती. गोलंदाजीतून चांगल्या प्रदर्शनाची मागणी होती, कदाचित नाणेफेक आमच्यासाठी वरदान ठरली. पॉवरप्लेनंतर चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येत होता. सुरुवातीला मेंडिसने आम्हाला दबावात टाकले होते. केशवने चांगली गोलंदाजी केली.”
पुढे बोलताना बावुमा म्हणाला, “जर आपण हे शिकू शकलो आणि आपल्यासमोर जे आहे, ते आपल्याला जुळवून घेतले पाहिजे. मला वाटत नाही की, पुढील खेळपट्टी खूप कठीण असेल. क्विंटन ठीक होईल, मैदानावर उतरला (दुसऱ्या डावात) नाही. मात्र, मला वाटते की, तो ठीक (पुढील सामन्यासाठी) होईल.”
कर्णधारच फ्लॉप
टेम्बा बावुमा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची वनडे क्रिकेटमधील सरासरी 54.68 इतकी शानदार आहे. मात्र, विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बावुमा खास प्रभाव टाकू शकला नाही. तो 5 चेंडूत 8 धावा करून स्वस्तात बाद झाला. दिलशान मदुशंका याने त्याची विकेट घेतली. मात्र, आगामी सामन्यात बावुमा मोठी भूमिका बजावू शकतो.
दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना 12 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना लखनऊ येथे खेळला जाणार आहे. (Captain temba bavuma gave a big reaction after the victory against sri lanka world cup 2023)
हेही वाचा-
दमदार दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमध्ये विजयी प्रारंभ! मेंडीस-असलंकासह शनाकाची झुंज व्यर्थ
World Cup 2023: अफगाणिस्तानने टेकले बांगलादेशसमोर गुडघे, मेहिदी हसनची अष्टपैलू कामगिरी