आयसीसी टी20 विश्वचषक 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाबाबत मोठे आणि आत्मविश्वासपूर्ण विधान केले आहे. गतविजेता भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरू शकतो, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
2024 च्या टी20 विश्वचषक विजयानंतर भारताने आजपर्यंत कोणतीही द्विपक्षीय मालिका किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा गमावलेली नाही. या कालावधीत भारताचा विजय-पराभवाचा आकडा 32-5 असा दमदार आहे. सध्या भारत आयसीसी टी20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर असून, संघातील अनेक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर 1 गोलंदाज वरुण चक्रवर्ती हे भारताचे प्रमुख हत्यार मानले जात आहेत.
“गतविजेता म्हणून भारतीय संघ या स्पर्धेतील स्पष्ट दावेदार आहेत. खेळाडूंचा सध्याचा फॉर्म, फिटनेस आणि त्यांनी अलीकडे खेळलेले क्रिकेट पाहता भारत इतर संघांपेक्षा एक पाऊल पुढे आहे,” असे शास्त्री म्हणाले. विशेषतः भारताची टॉप ऑर्डर सातत्याने धावा करत असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघांवर दबाव येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शास्त्री यांच्या मते, भारतीय निवड समितीने युवा खेळाडू आणि अनुभवी क्रिकेटपटू यांचा अचूक समतोल साधला आहे. “अनेक खेळाडूंसाठी हा पहिलाच विश्वचषक आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर फारसा ताण नाही आणि ते मोकळेपणाने खेळू शकतात. तर दुसरीकडे, मागील विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील अनुभवी खेळाडू संघाला स्थैर्य देतात,” असे ते म्हणाले.
जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांसारखे खेळाडू सध्या उत्तम लयीत आहेत. तिलक वर्मा फिट राहिल्यास तोही भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे शास्त्री यांनी नमूद केले. फिरकी गोलंदाजीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यामुळे भारताचा फिरकी विभाग अत्यंत मजबूत आहे.
मात्र, घरच्या मैदानावर विश्वचषक खेळताना दबाव येऊ शकतो, याबाबतही शास्त्री यांनी इशारा दिला. “टी20 क्रिकेटमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटांचा खराब खेळ सामन्याचा निकाल बदलू शकतो. भारताने हा दबाव योग्य प्रकारे हाताळला, तर संघाला रोखणे कठीण ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
भारत 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार असून, ग्रुप ‘ए’मध्ये अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि नामिबिया हे संघ भारतासमोर असतील.






