---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ धोनी-कोहली या भारतीय कर्णधारांनीच केला आहे तो पराक्रम

On: शुक्रवार, एप्रिल 17, 2020 9:00 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार होऊन गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने मोठे विजय मिळवून अविश्वसनिय विक्रमही केले आहेत. अनेकदा कर्णधारांनी केलेली कामगिरी सर्वांच्याच लक्षात रहाते. पण संघाचे नेतृत्व संभाळण्याची मोठी जबाबदारी असतानाही वैयक्तिकरित्याही चांगली कामगिरी करणे हे त्यांच्या समोर मोठे आव्हान असते.

हे आव्हान सर्वच कर्णधारांना पेलवते असे नाही. पण काही असेही कर्णधार आहेत ज्यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ५७६ खेळाडूंनी एका तरी सामन्यात नेतृत्व केले आहे. पण त्यातील केवळ ६ क्रिकेटपटूंना कर्णधार म्हणून १० हजारांहून अधिक धावा करता आल्या आहेत. या कर्णधारांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करणारे कर्णधार – (Captains who have scored 10000 or more runs in International Cricket)

१. रिकी पाँटिंग – ऑस्ट्रेलियाचा २ वेळेचा विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पाँटिंगची गणना दिग्गज कर्णधारांमध्ये होते. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ३२३ सामन्यांमध्ये आणि आयसीसी एकादश संघाच्या १ सामन्याचे असे मिळून एकूण ३२४ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.

या ३२४ सामन्यांमध्ये त्याने ४५.५४ च्या सरासरीने १५४४० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४१ शतकांचा आणि ८८ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १५ हजार धावांचा टप्पा पार करणाराही सध्यातरी एकमेव कर्णधार आहे. तसेच सर्वाधिक शतके करणाराही कर्णधार आहे.

२. ग्रॅमी स्मिथ – वयाच्या २२ व्या वर्षीच दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हाती घेणाऱ्या ग्रॅमी स्मिथनेही त्यांच्या कामगिरीने दिग्गज कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचे २८४ सामन्यांत तसेच आयसीसी एकादाश आणि आफ्रिका एकादश या संघांचे प्रत्येकी १ सामन्यात मिळून एकूण २८६ सामन्यांत नेतृत्व केले आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८६ सामन्यात कर्णधार म्हणून ४३.१२ च्या सरासरीने १४८७८ धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंगनंतर कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसराच क्रिकेटपटू आहे. स्मिथने याबरोबरच कर्णधार म्हणून ३३ शतके आणि ७७ अर्धशतके केली आहेत.

३. स्टिफन फ्लेमिंग – न्यूझीलंडचा कॅप्टनकूल असणाऱ्या स्टिफन फ्लेमिंगने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांनी १९९७ ते २००७ असे १० वर्षांच्या कालावधीत न्यूझीलंडचे ३०३ सामन्यांत नेतृत्व केले आहे. ते ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करण्याचा मान मिळवणारे पहिले कर्णधार आहेत.

त्यांनी ३०३ सामन्यात नेतृत्व करताना ३५.६८ च्या सरासरीने ११५६१ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या १५ शतकांचा आणि ६९ अर्धतकांचा समावेश आहे. फ्लेमिंग हे नेहमीच शांत स्वभावासाठी ओळखले जातात.

४. विराट कोहली – भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व स्विकारल्यापासून शानदार कामगिरी केली आहे. सध्या सक्रिय असलेल्या कर्णधारांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा एकमेव कर्णधार आहे.

त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८१ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना ६३.८३ च्या सरासरीने ११४२६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४१ शतकांचा आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत पाँटिंगसह अव्वल क्रमांकावरही आहे.

५. एमएस धोनी – भारताचा ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत ३३२ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याने कर्णधार म्हणून ४६.८९ च्या सरासरीने ११२०७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ११ शतकांचा आणि ७१ अर्धशतकांचा समावेश आहे.

धोनी हा कर्णधार म्हणून १० हजार धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिला कर्णधार आहे. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ वनडे विश्वचषक, २००७ टी२० विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी अशी आयसीसी स्पर्धांचे ३ मोठे विजेतीपदे मिळवली आहेत. असा पराक्रम करणाराही तो पहिला कर्णधार आहे.

६. ऍलेन बॉर्डर – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी कर्णधार म्हणून १० हजार धावांचा टप्पा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलेन बॉर्डर यांनी केला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे २७१ सामन्यांत नेतृत्व केले असून यामध्ये त्यांनी ४१.५७ च्या सरासरीने ११०६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या १७ शतकांचा आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

बाबारे! आयपीएलमध्ये निवड एवढ्या सहजासहजी नाही होतं रे

मोठ्या खेळाडूने सांगितले भारताच्या सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षकाचे नाव

सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यांत नाबाद राहणारे ५ महान क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---